कोल्हापुरातील नद्यांचे पाणी पात्रालगत

गेले दोन-चार दिवस दिलासा दिलेल्या पावसाने आज पुन्हा दिवसभर हजेरी लावली. राधानगरी धरणाचा शनिवारी दुपारी उघडलेला सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा अजूनही उघडाच असून, धरणातून दोन हजार 828 क्युसेक विसर्ग सुरू होता. धरण पाणलोटक्षेत्रासह सर्वत्र पावसाचा कमी झालेला जोर आणि धरणांतूनही विसर्ग अत्यल्प झाल्याने पात्राबाहेर पडलेल्या नद्यांचे पाणी आता पात्रालगत आले आहे.

पंचगंगेच्या पातळीतही काल सकाळपासून आज सायंकाळपर्यंत पाच फुटांची घट झाली. सायंकाळी चारच्या सुमारास पंचगंगेची पातळी 34 फूट 10 इंच झाली होती, तर 30 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. पंचगंगा 39 फुटांच्या इशारापातळीवरून धोकापातळीकडे निघाली असताना, सलग दोन वेळा महापुराचा फटका पाहता, जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पूर येणाऱ्या भागातील नागरिकांच्या स्थलांतरणावर भर दिला होता; पण राधानगरीचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडून आठ हजारांहून अधिक क्युसेक विसर्ग होत असतानाही पंचगंगेची पातळी 41 फूट चार ते पाच इंचांपर्यंत तीन दिवस स्थिरावली होती. पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरीचे चारही दरवाजे बंद झाले. दोन दिवसांपासून एकच दरवाजा उघडला असून, पॉवर हाऊससह एकूण दोन हजार 828 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पंचगंगेच्या पातळीत तासाला घट होत आहे.

जिह्यातील धरणांत 75.07 टीएमसी पाणीसाठा

जिह्यात एकूण 91.81 टीएमसी क्षमतेच्या राधानगरी, वारणा, दूधगंगा, तुळशीसह सर्व मोठय़ा, मध्यम व लहान धरण प्रकल्पांमध्ये सध्या 75.07 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राधानगरी 8.34 टीएमसी (99.70 टक्के), तुळशी 2.17 (64.80) पाणीसाठा आहे.

उजनी धरण प्लसमध्ये पाणीसाठा 63 टीएमसीवर

टेंभुर्णी, दि. 31 (सा. वा.) – सोलापूर जिह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण आज रात्री ‘मायनस’मधून ‘प्लस’मध्ये आले. 2 ते 31 जुलैपर्यंत 2000पासून 25000 क्युसेकपर्यंत दौंड येथून पाणी आल्यामुळे धरणात आजपर्यंत 36 टक्के पाणी जमा झाले. पाणीसाठय़ात 21 टीएमसीने वाढ झाली असून, सध्या एकूण उपलब्ध पाणीसाठा 63 टीएमसी झाला आहे. जूनच्या शेवटी उजनी लाभक्षेत्र दौंड, भिगवण, इंदापूर परिसर व पुणे जिल्हा पश्चिम घाटावर पाऊस झाल्यामुळे 2 जुलैपासून उजनीत पाणी येण्यास सुरुवात झाली. सध्या येणाऱ्या विसर्गामध्ये सातत्याने वाढ होत असून, जलाशयात दौंड येथून 12763 क्युसेक विसर्गाने सध्या पाणी येत आहे.