IPL 2024 : सॉल्टने काढली लखनऊची सालटी, कोलकात्याचा लखनऊवर आयपीएलमधील पहिला विजय

कोलकाता नाईट रायडर्सने अखेर लखनऊ सुपरजायंट्सचा विजयरथ रोखत या संघाविरुद्ध आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील पहिला विजय मिळविला. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या सलामीवीर फिल सॉल्टने दणकेबाज नाबाद 89 धावांची खेळी केली. कोलकात्याच्या गोलंदाजांनी लखनऊला 161 धावांवर रोखून आपल्या संघाला अर्धी लढाई आधीच जिंकून दिली होती.

सॉल्टची धडाकेबाज खेळी

लखनऊला 7 बाद 161 धावसंख्येवर रोखल्यानंतर कोलकात्याने 15.4 षटकांत केवळ 2 फलंदाजांच्या मोबदल्यात सहजपणे विजयाला गवसणी घातली. लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नरिन (6) व अंगकृष रघुवंशी (7) हे फलंदाज लवकर बाद झाल्याने कोलकात्याला मोठा धक्का बसला होता. मोहसिन खानने लागोपाठच्या षटकात या दोघांना बाद करून लखनऊच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र सलामीवीर फिल सॉल्टवर याचा काहीही परिणाम झाला नाही. त्याने लखनऊच्या गोलंदाजीची सालटी काढत 16 व्या षटकांत चौकार ठोकून सामना संपविला. सॉल्टने 47 चेंडूंत 14 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 89 धावांची खेळी सजविली. कर्णधार श्रेयस अय्यरने 38 चेंडूंत 6 चौकारांसह नाबाद 38 धावांची संयमी खेळी करीत सॉल्टला साथ दिली.

कोलकात्याचा टिच्चून मारा

त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 161 अशी असुरक्षित धावसंख्या उभारली. कोलकात्याच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्याने लखनऊला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार लोकेश राहुल (39), निकोलस पूरन (45) व आयुष बदोनी (29) यांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला म्हणून लखनऊला किमान दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. सलामीवीर क्विंटन डिकॉकने मिचेल स्टार्कच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार ठोकून आपल्या संघाला खणखणीत सुरुवात करून दिली. मात्र वैभव अरोराने डिकॉकला नरिनकरवी झेलबाद करून कोलकात्याला पहिले यश मिळून दिले. त्यानंतर दीपक हुड्डा (10) व मार्कस स्टॉयनिस (10) हे लवकर बाद झाल्याने लखनऊच्या फलंदाजीवर दडपण आले. त्यामुळे त्यांना समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. राहुलने 27 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार ठोकले, तर पूरनने 32 चेंडूंत 45 धावांची खेळी करताना 4 टोलेजंग षटकारांसह 2 चौकार लगावले. कोलकात्याकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 बळी टिपले. वैभव अरोरा, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती व आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.