मोहरमच्या पार्श्वभूमीवर 138 समाजकंटकांवर कोतवाली पोलिसांची तडीपारीची कारवाई

मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी 227 समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामध्ये 138 गुंडांना नगर शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तसेच मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

मोहरम सण 20 जुलै पासून सुरू झाला असून शुक्रवारी रात्री मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर 29 जुलै रोजी दुपारी मोहरमची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मोहरम उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील समाजकंटकांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. सीआरपीसी 107 प्रमाणे 71, सीआरपीसी 110 प्रमाणे 14, मुंपोकाक 56 प्रमाणे 4 गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव व॒ सीआरपीसी 144(2) नुसार 138 समाजकंटकांना नगर मोहरम उत्सव कालावधीमध्ये तडीपार करण्यात आले आहे. तसेच सीआरपीसी कलम 149 अन्वये 95 जणांना शांतता व सुव्यवस्था राखण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मिरवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन तसेच व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशखर यादव यांनी दिली.

105 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली आणि तोफखाना पोलिसांकडून मिरवणूक मार्गावर 105 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर लाकडी व लोखंडी बॅरीकेटींग करण्यात येणार आहे. तसेच संवेदनशिल ठिकाणी बॅरीकेटींगचे आतुन व बाहेरुन बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. मिरवणुकीचे दुतर्फा गल्ली बोळातुन समांतर पेट्रोलिंग, टॉवर बंदोबस्त, सवारी बंदोबस्त, सेक्टर बंदोबस्त, टेंभा बंदोबसत, सरबतगाडी बंदोबस्त, मोबाईल पेट्रोलिंग व सेक्टर पेट्रोलिंग असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.