केवळ अडीच वर्षाच्या अरिबा शेखने घेतली गगनभरारी, 200 देशांची माहिती शिकून केला जागतिक विक्रम

लहान मुले म्हणजे मातीचा गोळा असे म्हटले जाते. तुम्ही जसे घडवाल तशी मुले घडतात. याचा अनुभव घ्यावयाचा असेल तर तुम्हाला अरिबा आयुब शेख या तीन वर्षांच्या चिमुकलीला भेटावे लागेल. केवळ अडीच वर्षांच्या वयात तिने थेट जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.

लातूर येथील मूळ रहिवासी असणारे आयुब शेख हे आपल्या कुटुंबियासह सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. पुणे येथे असणार्‍या बँक ऑफ न्यूयॉर्कच्या शाखेत टेक्निकल हेड म्हणून काम करतात. दिनांक 9 एप्रिल 2019 रोजी त्यांना मुलगी झाली. तिचे नाव अरिबा असे ठेवण्यात आले. कोव्हिड 19मध्ये वर्क फ्रॉम होम असल्याने ते पूर्ण वेळ आपल्या मुलीसोबत राहिले. दोन वर्षांची अरिबा बोलत असताना त्यांनी तिला शिकवण्यास सुरुवात केली. केवळ सहा महिन्यांत ती शिकून तरबेज झाली. जगभरातील तब्बल 200 देशांची माहिती तिला शिकवण्यात आली. या देशांची नावे, त्या देशांच्या राजधानीची शहरे, त्या देशाचा राष्ट्रध्वज ही सर्व माहिती ती शिकली. एवढेच नाही तर जगाच्या नकाशावर आपण कुठल्याही ठिकाणी हात ठेवला तर त्या देशाची माहिती ती काही सेकंदामध्ये सांगते. जगांच्या नकाशावरील सांगितलेल्या देशाचे स्थान ती दर्शवते.

अतिशय तल्लख बुद्धीमत्ता असणारी अरिबा शिकण्यासाठी फार वेळ घेत नाही. एक – दोन वेळा सांगितले की, तिच्या पक्के लक्षात राहते. केवळ जगातील विविध देशांचीच ती माहिती सांगत नाही, तर आपल्या देशातील विविध राज्यांची माहितीसुध्दा ती सांगते. लहानपणापासून तिचा खेळ म्हणजे कोडी सोडवणे, नकाशे तयार करणे यात ती रमते. केवळ अडीच वर्षांच्या वयात तिने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर जग पादाक्रांत केले आहे. पुणे येथे आता नर्सरीमध्ये शिक्षणासाठी तिला प्रवेश देण्यात आला आहे.

अरिबाच्या बौद्धीक कौशल्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, इंटरनॅशनल बुक ऑफ सुपर टॅलेंटेड किड, एशियाही बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, ओमजी बुक ऑफ रेकॉर्ड अशा विविध संस्थांनी घेतली आहे. अरिबाने केलेल्या विक्रमाची माहिती झाल्यानंतर तिचे सर्व जण कौतुक करतात. पारितोषिके देऊन सत्कार केला जातो. केवळ 6 महिन्यांत तीने शिक्षण घेऊन थेट जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. हासुद्धा एक लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.