कुछ तो गडबड है… मोदीच म्हणतात, अदानी, अंबानींनी निवडणुकीत टेम्पो भरून काळा पैसा वाटला!

अंबानी-अदानींसाठी पायघडय़ा घालणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूर अचानक बदलला आहे. आज जाहीर सभेत काँग्रेस आणि राहुल गांधी यांना लक्ष्य करताना मोदींनी थेट अंबानी-अदानींवर काळ्या पैशांवरून गंभीर आरोप केला. निवडणुका जाहीर झाल्यापासून राहुल गांधी यांनी अंबानी-अदानींना शिव्या देणं बंद केलंय, असा दावा करत, ‘असं का? त्यांच्याकडून किती वसूल केलेत? तुमच्याकडे किती काळा पैसा आहे. टेम्पो भरून नोटा काँग्रेसपर्यंत पोहोचल्यात का? काय डील केले?’’ असे प्रश्न मोदींनी विचारले. त्यावरून वादळ उठलं असून ‘‘अदानी-अंबानी टेम्पो भरून पैसे देतात, हा तुमचा स्वतःचा अनुभव सांगितला का?’’ असा सवाल करत राहुल गांधी यांनी मोदींवर पलटवार केला.

तेलंगणातील करीम नगरमध्ये प्रचार सभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी नेहमीप्रमाणे काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली व प्रथमच अंबानी-अदानींचे नाव त्यांच्याशी जोडले. ‘‘गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसचे राजकुमार सकाळी उठल्याबरोबर जपमाळ जपायला सुरुवात करत होते. जेव्हापासून त्यांचे राफेल प्रकरण चर्चेत आले, तेव्हापासून त्यांनी नवी जपमाळ हातात घेतली, पाच उद्योगपती, पाच उद्योगपती… मग हळूच म्हणू लागले, अंबानी-अदानी. मात्र निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी-अदानींना शिव्या देणंच बंद केलंय, असं का? असा सवाल मोदींनी राहुल गांधी यांना केला. काँग्रेसच्या युवराजांनी या निवडणुकीत अंबानी आणि अदानींकडून किती माल उचलला, हे जाहीर करावे. काळ्या पैशांच्या गोण्या भरून रुपये आणले आहेत की टेम्पो भरून नोटा काँग्रेससाठी पोहोचल्या आहेत. काय डील केले, की ज्यामुळे तुम्ही रातोरात अंबानी आणि अदानींना शिव्या देणं बंद केलंय. पाच वर्षांपर्यंत शिव्या दिल्या आणि रातोरात बंद केल्या. दाल में कुछ तो काला है. काहीतरी चोरीचा माल टेंम्पोमध्ये भरून तुम्हाला मिळालाय. याचं उत्तर द्यावं लागेल, असे मोदी म्हणाले. त्याला काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे व मोदींचा खोटेपणा उघड केला आहे.

मोदी-अदानींचे नाते काय? प्रश्न विचारत राहणार

निवडणूक जाहीर झाल्यापासून राहुल गांधी यांनी अंबानी-अदानींविरुद्ध बोलणे बंद केले म्हणणाऱया मोदींचा खोटारडेपणा काँग्रेसने उघडा पाडला आहे. राहुल गांधी यांची 2 मे रोजी कर्नाटकात, 3 मे रोजी महाराष्ट्रात, 5 मे रोजी तेलंगणात, 6 मे रोजी मध्य प्रदेशात, 7 मे रोजी झारखंडमध्ये जाहीर सभा झाली. या सर्वच सभांमधून राहुल यांनी मोदी-अदानी-अंबानी कनेक्शनवर हल्ला चढवला आहे. त्याचे व्हिडीओ फुटेज काँग्रेसने तारीखवार ट्विट केले असून मोदींचे

अदानींशी नाते काय, हा प्रश्न आम्ही विचारतच राहणार, असे ठणकावले आहे. मोदीजी, घाबरलात का… ईडी-सीबीआय तुमच्या हातात आहे, चौकशी कराच!

भाजपच्या भ्रष्टाचाराच्या टेम्पोचा चालक कोण हे देशाला माहीत आहे. अदानी-अंबानी टेम्पो भरून पैसे देतात. हा तुमचा स्वतःचा अनुभव आहे का?

भाजपच्या भ्रष्टाचाराच्या टेम्पोचा चालक कोण आणि क्लीनर कोण, हे देशाला माहीत आहे, असे नमूद करत राहुल गांधी यांनी मोदींवर पलटवार केला. ‘‘मोदीजी, घाबरलात का? आजवर तुम्ही बंद खोलीत अदानी आणि अंबानींबद्दल बोलत होता, आता पहिल्यांदाच तुम्ही जनतेसमोर अदानी-अंबानींचा उल्लेख केला आणि तुम्हाला हेसुद्धा माहीत आहे का की अदानी-अंबानी टेम्पो भरून पैसे देतात. हा तुमचा स्वतःचा अनुभव आहे का? एक काम करा… सीबीआय आणि ईडीला त्यांच्याकडे पाठवा. पूर्ण चौकशी लवकरात लवकर करा. घाबरू नका तुम्ही, असे राहुल यांनी नमूद केले. जेवढा पैसा मोदींनी अदानी-अंबानींना दिला आहे तेवढा पैसा आम्ही हिंदुस्थानातील गरीबांना देणार आहोत. महालक्ष्मी, पहली नोकरी पक्की योजनांच्या माध्यमातून करोडो लखपती आम्ही बनवणार आहोत. यांनी 22 अब्जाधीश बनवले, आम्ही करोडो लखपती देशात बनवणार, असे राहुल म्हणाले.