वाढवण बंदर होऊ देणार नाही; आदित्य ठाकरे यांनी सरकारला ठणकावले, महाविकास आघाडीच्या रॅलीने विरार दणाणले

शिवसेना झिंदाबाद.. महाविकास आघाडीचा विजय असो.. गद्दारांना गाडणारच.. विजयाची मशाल धगधगणारच.. अशा गगनभेदी घोषणांनी आज विरार दुमदुमून गेले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हजारो शिवसैनिकांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरातून दणदणीत रॅली काढली. या रॅलीला ठिकठिकाणी नागरिकांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालघर लोकसभेच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांना विजयी करणारच, असा निर्धारही करण्यात आला. दरम्यान यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजप व मिंध्यांवर सडकून टीका करतानाच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असून शिवसेना या प्रकल्पाची एक वीटही रचू देणार
नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.

शिवसेना-इंडिया आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी आज विरारमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी पालघर लोकसभा शिवसेना इंडिया आघाडीच्या उमेदवार भारती कामडी, जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, लोकसभा संघटक जनार्दन पाटील, उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे, जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद वैद्य, उपतालुकाप्रमुख मनीष वैद्य, शहर संघटक शिला लष्करे, तालुकाप्रमुख स्वप्नील बांदेकर, शिवसेना प्रवक्त्या आनंद दुबे, विरार शहरप्रमुख गणेश भायदे, नालासोपारा शहरप्रमुख प्रदीप सावंत तसेच असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र ‘मविआ’चा गड

तुळींज-संतोष भुवन येथे रॅलीची सांगता झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी वसई हा बविआचा गड असल्याचा प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र हा ‘मविआ’चा गड असल्याचे सांगत राज्यात सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेना भूमिपुत्रांच्या सोबत असून वाढवण बंदराला आमचा कायम विरोध आहे असे सांगितले. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पक्ष म्हणून कायम देशहितासाठी बोलत राहील. आमचा चोरलेला धनुष्यबाण व पक्ष सुप्रीम कोर्टातून पुन्हा आम्हाला मिळेल असेही स्पष्ट केले. इलेक्टोरल बॉण्ड हा जगातील कदाचित सर्वात मोठा घोटाळा असेल, असे सांगत त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.

माजी मंत्री ताराबाई वर्तक यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

काँग्रेसच्या दिवंगत माजी राज्यमंत्री ताराबाई वर्तक यांच्या नावाने असलेल्या ताराबाई वर्तक मेमोरियल अॅकॅडमी या सीबीएससी बोर्डाच्या संस्थेला आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी वर्तक यांच्या कुटुंबीयांचीदेखील सदिच्छा भेट घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास वर्तक, माजी युवाध्यक्ष पुष्पराज वर्तक यांच्याशी चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील, जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा, जिल्हा सरचिटणीस किरण शिंदे, वसई महिलाध्यक्षा बिना फुर्य्याडो उपस्थित होते.