75 टक्के नालेसफाई पूर्ण

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे पालिकेने पावसाळापूर्व कामांना वेग दिला असून नालेसफाई पूर्ण करण्यासाठी 31 मेची डेडलाइन असताना 10 मेआधीच 75 टक्के नालेसफाई पूर्ण केली आहे. शिल्लक काम 15 मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून शिल्लक 15 दिवसांत पाणी तुंबणारी ठिकाणे, पाथ मुखे आणि मिठी नदीच्या महत्त्वाच्या ठिकाणची पुन्हा एकदा सफाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

मुंबईत दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला नालेसफाईचे काम सुरू होते. मात्र या वर्षी हे काम 15 ते 20 दिवस उशिराने सुरू झाल्यामुळे 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण होणार का सवाल निर्माण झाला होता. मात्र पालिकेच्या माध्यमातून नालेसफाईचे काम वेगाने करण्याचे आदेश पंत्राटदारांना देण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी दिवसरात्र काम सुरू ठेवून काम करण्यात आले. त्यामुळेच 31 मेची डेडलाइन पूर्ण होण्याआधीच काम पूर्ण करणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

असे झाले काम

मुंबई शहर     – 63.69 टक्के

पूर्व उपनगर   – 78.38 टक्के

पश्चिम उपनगर – 69.71 टक्के

मिठी नदी      – 83.83 टक्के

छोटे नाले      – 75.76 टक्के

हायवे नाले    – 79.03 टक्के

या वर्षी गाळ काढण्याचे उद्दिष्ट

या वर्षी 31 मेपर्यंत पावसाळय़ापूर्वी एकूण 10 लाख 21 हजार 782.1 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यातील 778540.04 म्हणजेच एकूण उद्दिष्टापैकी 76.19 टक्के गाळ आतापर्यंत काढण्यात आला आहे. मुंबईत पावसाळय़ाआधी एकूण नालेसफाईच्या 75 टक्के नालेसफाई केली जाते. यामध्ये पावसाळय़ापूर्वी 10 टक्के तर पावसाळय़ानंतर 15 टक्के नालेसफाईचे काम केले जाते.