मुंबईत लोड वाढला; ठाणे, नवी मुंबईत वीज गुल; महानगरीने 3300 ऐवजी खेचले चार हजार मेगावॅट

मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात तापमानाचा पारा जवळपास 40 अंश सेल्सिअसच्या आसपास गेल्याने मोठ्या प्रमाणात सर्वत्र उकाडा वाढला आहे. पंखे, एसी, कुलरचा वापर वाढल्यामुळे मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून विजेची रेकॉर्डब्रेक मागणी झाली आहे. आज दुपारी मुंबईत विजेचे डिमांड थेट चार हजार मेगावॅटपर्यंत गेले आणि त्याचा जोरदार फटका नवी मुंबई आणि ठाणे शहराला बसला. ओव्हर लोडिंगमुळे ऐरोली येथील पडघा सबस्टेशनमध्ये बिघाड झाला आणि सर्किट नंबर एक बंद पडले. त्यामुळे या दोन्ही शहरांत भरदुपारी बत्ती गुल झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले. दरदिवशी मुंबई शहराला 3 हजार 300 मेगावॅट विजेची आवश्यकता असते. मात्र आज ही मागणी अचानक 600 मेगावॅटने वाढल्याने वीज वितरण करणाऱ्या यंत्रणेवर प्रचंड ताण पडला.

तापमानाचा पारा वाढत चालल्यामुळे सर्वत्र पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्र, फ्रीज आदी उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी सध्या राज्यात विजेचे डिमांड थेट 24 हजार 234 मेगावॅटपर्यंत गेले आहे. तापमानात वाढ होत चालल्यामुळे मुंबई आणि एमएमआरडीए क्षेत्रात उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुंबई शहरात काल विजेचे डिमांड थेट 4 हजार 41 मेगावॅटपर्यंत गेले. हे डिमांड चालू वर्षात सर्वाधिक आहे. आज दुपारी 2.25 वाजता

मुंबई शहराचे विजेचे डिमांड 3 हजार 900 मेगावॅटपर्यंत गेले. या ओव्हरलोडमुळे ऐरोली येथील पडघा सबस्टेशनमध्ये 400 केव्हीचे सर्किट नंबर एक बंद पडले. त्यामुळे ठाणे शहरातील कलरकेम, नवी मुंबईतील महापे, वाशी आणि टेमघर येथील अति उच्चदाब केंद्र बाधित झाली. भरदुपारी नवी मुंबईत दिघ्यापासून ते वाशीपर्यंत आणि ठाणे शहरात नौपाडा, पाचपाखाडी, विकास कॉम्प्लेक्स माजिवडा, तलावपाळी या भागातील वीजपुरवठा खंडित झाला.

विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली
तापमानात सर्वत्र वाढ झाल्यामुळे पंखे, एसी आणि कुलर आदी उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी विजेची मागणीही वाढली आहे. आज ओव्हरलोडिंगमुळे पडघा केंद्रातील सर्किट नंबर एक बंद पडले. मात्र ही बिघाड तातडीने दुरुस्त करून वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया वाशी परिमंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी व्यक्त केली.

सणासुदीच्या दिवशी मनस्ताप
रामनवमीचा उत्सव आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना भरदुपारी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले. या उकाड्यातून सुटका करून घेण्यासाठी अनेक नागरिकांना हातपंख्यांचा आधार घ्यावा लागला. सणासुदीच्या दिवशी वीज गेल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी साडेतीन ते चारदरम्यान वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला.