Lok Sabha Election 2024 : भाजपची शिस्त बासनात गुंडाळून हिंगोलीत तिघांची उमेदवारी दाखल

प्रचंड आदळआपट करून लावणीफेम विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा राजकीय बळी घेऊनही भाजपचे समाधान झालेले नाही. जगातील सर्वात मोठा पक्ष असा अहंकार बाळगणार्‍या भाजपला हिंगोलीत बंडखोरीची लागण झाली आहे. भाजपच्या तीन कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून लोकसभेसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

हिंगोलीत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपने मिंधे गटाशी असहकार पुकारला. हेमंत पाटील उमेदवार नको, अशी भूमिका भाजपने घेतली. अखेर भाजपपुढे शरणागती पत्करून मिंध्यांनी हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळेकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीचा बळी घेऊनही भाजपचे समाधान झालेले नाही.

भाजपचे पदाधिकारी धनेश्वर गुरू आनंद भारती, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी जाधव आणि भाजपचे हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडाचे निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. भाजपमधील या बेशिस्तीमुळे मिंध्यांच्या डोक्याला चांगलाच ताप झाला आहे.