मुंबईत मतदान, चाकरमानी कोकणात; मेमध्ये एसटी, रेल्वे, लक्झरी बस फुल्ल

एका आकडेवारीनुसार एसटी बसने उन्हाळी सुट्टय़ांच्या काळात अडीच लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात जातात. त्याशिवाय स्वतःच्या खासगी कारने जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वेगळी आहे.

सध्या शाळा-कॉलेजच्या परीक्षा संपून मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टय़ांचा मोसम सुरू झाला आहे. मुंबईतील चाकरमानी कोकणाकडे रवाना होण्याच्या मार्गावर आहेत. रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेसचे बुकिंग फुल झाले आहे. खासकरून 20 मे रोजी मुंबई आणि परिसरात होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी पाच लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात असतील असा प्राथमिक अंदाज आहे. परिणामी मुंबईत मतदानाचा टक्का घसरण्याची भीती आहे. याचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसणार आहे.

मुंबईत लालबाग, परळपासून भांडुप, घाटकोपर, बोरिवली, नालासोपारा, वसई, विरार यासह विविध भागांत कोकणवासीयांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सव व मे महिन्याच्या सुट्टय़ांच्या काळात चाकरमानी आवर्जून कोकणात जातात. आताही चाकरमानी कोकणात जाण्याच्या तयारीला लागले आहेत.

रोज अडीच हजार प्रवासी कोकणाकडे

सर्वसाधारणपणे सुट्टय़ांच्या मोसमात मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला- नेहरूनगर या बस स्थानकातून दररोज साधारण दोन ते अडीच  हजार प्रवासी मुंबईतून कोकणात जातात.

निवडणुकीच्या मतदानाच्या काळात म्हणजे 18, 19 व 20 मे रोजी एसटी बसेसचे संपूर्णपणे बुकिंग फुल झाले आहे. 20 मे रोजी मुंबई महानगर प्रदेशात मतदान आहे. मतदानाच्या तारखेच्या दोन-तीन दिवस आधीपासून चाकरमानी मुंबईतून रवाना होत आहेत.

15 मेनंतर परतीचा प्रवास

मतदानाच्या दिवशी बुकिंग फुल असले तरी 15 नंतर शक्यतो कोकणवासी मुंबईकडे परत येण्यास निघतात.

20 मे रोजी मुंबईत लोकसभेसाठी मतदान असल्यामुळे कदाचित मतदानाच्या दिवशी सर्व चाकरमानी कोकणातून परत येतील अशी आशा एसटी महामंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. यंदा 15 मेनंतरच परतीचा प्रवासासाठी बुकिंग सुरू आहे, अशी माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

एसटीच्या दररोज दीडशे बसेस कोकणात

एस.टी. महामंडळाच्या मुंबईतून दीडशेहून अधिक बसेस दररोज कोकणच्या दिशेने रवाना होतात. त्यात रायगडसाठी 67, रत्नागिरीसाठी 42 आणि सिंधुदुर्ग जिह्यासाठी 30 बसेसचा समावेश आहे. या नियमित बसेसच्या व्यतिरिक्त मुंबईतून दररोज रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गासाठी 25 जादा बसेस सोडल्या आहेत.

मुंबईतील कोकणवासी मे महिन्यात सुट्टीला गावी जाण्यासाठी दोन महिने अगोदरच बुकिंग करतात. राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच कोकणवासीयांनी कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसचे बुकिंग केले आहे.

मुंबईतील 2019 मधील लोकसभा मतदानाची आकडेवारी 

दक्षिण मुंबई          53.1 टक्के

मुंबई उत्तर-पश्चिम      50.3 टक्के

मुंबई उत्तर-मध्य     56.7 टक्के 

मुंबई दक्षिण-मध्य    58.4 टक्के

मुंबई उत्तर-पूर्व      60.3 टक्के

मुंबई उत्तर           64.1 टक्के

ट्रेनने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या तर प्रचंड आहे. कोकणकन्या, मांडवी, तुतारी एक्प्रेस, तेजस, दिवा- सावंतवाडी, रत्नागिरी पॅसेंजर या प्रमुख ट्रेनचे मे महिन्यातील बुकिंग फुल आहे. प्रवासी वेटिंग लिस्टवर आहेत. त्याशिवाय सुट्टीच्या काळात रेल्वेच्या जादा गाडय़ा सोडल्या जातात. या सर्व ट्रेनमधून अडीच ते तीन लाखांहून अधिक चाकरमानी कोकणाकडे जातात. खासगी लक्झरी बसेसचे बुकिंगही फुल होण्याच्या मार्गावर आहे.