लोकसभेची ही निवडणूक तुमच्या-माझ्या राजकीय भविष्याची! जयंत पाटील यांचे प्रतिपादन

राज्यात राजकीय वातावरण झपाटय़ाने बदलत असून, ही निवडणूक तुमच्या-माझ्या राजकीय भवितव्याची निवडणूक आहे. आपण ज्याप्रमाणे विधानसभेला मताधिक्य देता, तसे मताधिक्य देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित (आबा) पाटील-सरूडकर यांना विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी केले. राज्यात महाविकास आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महाविकास आघाडीचे 30 ते 32 खासदार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ईश्वरपूर येथील गांधी चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचाराची सांगता जाहीर सभेने झाली. यावेळी उमेदवार सत्यजित पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, मेहबूब शेख, यशवंत गोसावी, प्रतीक पाटील, ऍड. चिमण डांगे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, दादासाहेब पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, शकील सय्यद, योजना पाटील, उदयसिंह सरनोबत, मानव गवंडी, राजेंद्र शिंदे, संदीप जाधव, ऍड. आर. आर. पाटील, ‘आप’चे गजानन पाटील उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, लोकसभेची ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. दोन मराठी माणसांचे पक्ष फोडून महाराष्ट्र लुटला जात आहे. महागाई, भ्रष्टाचार, बेकारी व महिलांवरील अत्याचाराविरोधात लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राज्यातील सभांना होणारी गर्दी पाहता भाजपच्या 400 पारमधील हवा कमी झाली आहे. आता 200 पार करताना त्यांना दमछाक होत आहे. आपण महाविकास आघाडीतून 10 जागा लढवित आहोत, त्यातील किमान 8 ते 9 जागा निवडून येऊ शकतात. सत्यजित पाटील हे सरळ आणि शांत स्वभावाचे, कामाचा अनुभव असणारे, तसेच सर्व घटकांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत. ते आपल्या संपर्कात राहतील, आपल्या विकासकामांना गती देतील, याची गॅरंटी मी देतो, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, आपल्या तालुक्यास क्रांतिकारी विचारांचा वारसा आहे. आपणास स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई जिंकायची आहे. मोदींच्या गॅरंटीला वॉरंटी आहे का? त्यांनी 15 लाख रुपये, 2 कोटी नोकऱया, शेतकऱयांना हमीभाव, गरिबांना पक्की घरे या पूर्वी दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? देशात युवकांची संख्या 46 कोटी आहे. मात्र, त्यातील 65 टक्के युवकांच्या हाताला काम देऊ शकले नाहीत. तुम्हाला 400 पारची एवढी खात्री आहे, मग पंतप्रधान, गृहमंत्री राज्यात गावागावात सभा घेत का फिरत आहेत? त्यामुळे भाजपच्या पराभवाची सुरुवात आपल्या महाराष्ट्रातून करूया, असे आवाहन त्यांनी केले.

विजयराव पाटील, प्रा. श्यामराव पाटील, नेताजीराव पाटील, विनायक पाटील, पै. भगवान पाटील, विश्वनाथ डांगे, ऍड. धैर्यशील पाटील, संदीप पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, पुष्पलता खरात, मुनीर पटवेकर, पिरअली पुणेकर, अरुण कांबळे, दिग्विजय पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अकलूजची पळापळ आणि अधिकाऱयांना वास

n जयंत पाटील म्हणाले, अकलूजमध्ये एक छोटेसे काम करून आलोय. तेव्हापासून भाजपाचे बडे बडे नेते रात्रंदिवस हेलपाटे घालत आहेत. आम्ही छोटेच काम करतो; मात्र करेक्ट करतो. राज्यात आपलेच सरकार येणार आहे. आज काही अधिकाऱयांना फोन केले, ते इतके नम्र बोलत होते; कारण अधिकाऱयांना पहिल्यांदा सत्तेचा वास चटकन येतो, असे त्यांनी म्हटले.