लोकसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये जवानांच्या वाहनावर हल्ला

लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडण्यासाठी अवघे तीन दिवस राहिले आहेत. पहिल्या टप्प्यात देशभरात 102 जागांसाठी मतदान होणार आहे. यात आसाम या राज्यातील काही जागांचा समावेश आहे. तत्पूर्वी कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला असूनही हिंदुस्थानी जवानांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.

हा हल्ला मंगळवारी सकाळी तिनसुकिया जिल्ह्यातील मार्गेरिटा येथे झाला. या मार्गावरून हिंदुस्थानी जवानांच्या आसाम रायफल्सची तुकडी जात होती. सकाळी आठ वाजता जेव्हा ही तुकडी मार्गेरिटा चांगलांग मार्गावर नामदांग पर्वतराजीतून प्रवास करत होती, त्यावेळी त्यांच्चा गाडीवर हल्ला करण्यात आला.

या हल्ल्याची जबाबदारी युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम इंडिपेन्डंट अर्थात उल्फा आय या संघटनेने घेतली आहे. या संघटनेने एक अधिकृत जबाब जाहीर केला असून याला ऑपरेशन रिवेंज असं नाव दिल्याचं म्हटलं आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी आसाम रायफल्सच्या जवानांच्या गाडीवर उग्रवादी हल्ला झाला. गाडीवर बेछुट गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात काही सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत असली तरी अद्याप त्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.