Lok Sabha Elections 2024 – निवडणुकीपूर्वी भाजपला झटका; या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपमधील अनेक नेते नाराज असल्याचेही समोर आले आहे. त्यांमुळे अनेकांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. भाजपविरोधात बंडखोरी केलेल्या नेत्यांमध्ये आता अजून एका नेत्याचा समावेश झाला आहे. झारखंडचे भाजप आमदार जयप्रकाश भाई पटेल यांनी बुधवारी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सध्या राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे.

जयप्रकाश यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यांचा एक व्हिडिओ देखील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. यावेळी ते म्हणाले की, मी कोणत्याही लोभासाठी किंवा पदासाठी नाही तर या देशाच्य़ा भवितव्यासाठी आणि माझ्या वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. भाजपामध्ये असताना मी माझ्या वडिलांची विचारधारा पुढे नेऊ शकलो नाही. त्यामुळे ते त्यांचे ते स्वप्न मी आता पूर्ण करणार आहे. असे ते म्हणाले.

तसेच राज्यातील इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी काम करण्याची शपथ देखील जयप्रकाश यांनी यावेळी घेतली. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’मुळे झारखंडमधील लोकांमध्ये त्यांच्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. त्य़ामुळे झारखंड वासियांनी राज्यातील सर्व 14 लोकसभा जागांवर इंडिया आघाडीचा विजय सुनिश्चित करण्याचा संकल्प घेतला आहे. भाजपचे आमदार जयप्रकाश भाई पटेल यांनी पक्षाच्या मुख्यालयात झारखंड AICC प्रभारी गुलाम अहमद मीर, झारखंड काँग्रेसचे प्रमुख राजेश ठाकूर, झारखंडचे मंत्री आलमगीर आलम आणि पक्षाचे मीडिया आणि प्रचार विभाग प्रमुख पवन खेडा यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.