पत्नीने पतीसोबत शारीरिक संबंध न ठेवणे ही मानसिक क्रूरता, घटस्फोटाला वैध कारण -उच्च न्यायालय

मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने एका प्रकरणात मोठा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर पत्नीने पतीसोबत शारीरिक संबंध न ठेवणे ही मानसिक क्रूरता म्हटले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. शिवाय ते कारण घटस्फोटासाठी वैध कारण असू शकते पती आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ शकतो. पत्नीने सतत शारीरीक संबंधांसाठी नकार देणे हे पतीसाठी मानसिक, भावनिक त्रासाचे कारण होऊ शकते. त्यामुळे हिंदू विवाह कायद्य़ाअंतर्गत अशा पत्नीपासून पती घटस्फोट घेण्यासाठी ते वैध कारण आहे.

जबलपूरमध्ये न्यायमूर्ती शील नागू आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपिठाने सुदीप्तो साहा आणि मौमिता साहा यांच्या केसची सुनावणी करताना नोंदवले आणि भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णय फेटाळला. यामध्ये कौटुंबिक न्यायालयाने 2014साली दिलेल्या निर्णयात सुदीप्तो यांना घटस्फोट देण्यास नकार दिला होता. सुदिप्तो साहा यांनी न्यायालयात सांगितले होते की, त्यांची पत्नी शारीरीक संबंध ठेवण्यास नकार देत होती. त्यामुळे प्रचंड मानसिक ताण आला होता. अनेक प्रयत्न करुनही ती सातत्याने नकार देत असल्याने सुदीप्तोने न्यायालयाचे दार ठोठावले. त्याने न्यायालयात याचिका दाखल करुन पत्नी मौमिताकडे घटस्फोटाची मागणी केली. दोघांचे लग्न 12 जुलै 2006ला झाले होते. याचिकेत म्हंटलेय की, लग्नाच्या दिवसापासून 28 जुलैपर्यंत तिने शारीरीक संबंध ठेवले नाही. त्यानंतर सुदीप्तो परदेशात गेला. त्याच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार तिचे लग्न घरच्यांनी बळजबरीने केले होते. या लग्नाने ती आनंदी नव्हती. त्यामुळे ती सातत्याने तिच्या नवऱ्याला शारीरीक संबंध ठेवण्यास नकार देत होती. मौमिताचे एका तरुणावर प्रेम होते. मौमिताने तिच्या नवऱ्यालाही सांगितले होते की, तिला तिच्या प्रियकराकडे जायचेय. नवऱ्याने सांगितले 2006 सप्टेंबरला मौमिता भोपाळ येथील घर सोडून निघून गेली ती कधीच परतली नाही.

या प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सांगितले की, वैवाहिक प्रकरणांमध्ये मानसिक क्रूरता ठरवण्यासाठी कोणतेही निश्चित मापदंड असू शकत नाहीत. योग्य निर्णय घेण्यासाठी, त्यातील तथ्यांच्या आधारे त्याचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने सांगितले की, पत्नीने पतीने केलेल्या दाव्याला विरोध केला नाही. अशा परिस्थितीत पतीने केलेले युक्तिवाद नाकारता येत नाहीत. मानसिक क्रूरतेमुळे पतीला पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.