‘साहेब, तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हा’; महा शिवअभिषेकाचे आयोजन करत घातले साकडे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी वाढदिवस आहे. इर्शाळवाडी येथील घटनेमुळे जन्मदिवस साजरा करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनी ‘साहेब, तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हा’ अशी प्रार्थना करत गावागावात महा शिवअभिषेक आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांनी दिली आहे.

वर्तमान परिस्थितीत महाराष्ट्राचे राजकारण दिशाहीन झाले असून, सत्ता, स्वार्थ आणि बचाव यासाठी वाटेल ते करण्यासाठी पळापळ करणारे महाराष्ट्रातील नेते यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनता, शेतकरी, युवा पिढी संभ्रमात आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरिता परत एकदा उद्धव साहेबच मुख्यमंत्री व्हावेत, अशी महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे. यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी ग्रामीण भागात आपापल्या गावात अभिषेक करून उद्धव साहेबांना चांगले आरोग्य त्याचबरोबर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. कोपरगाव लायन्स मूकबधिर विद्यालयातील मुलांना मिष्टान्न भोजन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह येथील मुलांना साहित्य वाटप मिष्टान्न भोजन, कोकमठाण येथील गोशाळा मोफत चारा वाटप करण्यात आले अशी माहिती जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी दिली. यावेळी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, उपजिल्हाप्रमुख असलम शेख, शहर प्रमुख सनी वाघ, माजी शहरप्रमुख भरत मोरे श्रीरामपूरचे अशोक थोरे, शेखर दूभैया, अरुण पाटील, विजय गव्हाणे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

27 ते 5 ऑगस्ट ग्रामीण व शहरी भागात गावागावात व शहरातील प्रत्येक प्रभागात शाखांचे उद्घाटन कार्यक्रम केले जाणार असून गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हा उपक्रम संपूर्ण सप्ताह केला जाणार आहे.