महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका? हवामानातील बदलामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता

यंदा लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना सर्वाधिक बसला आहे. तसेच अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळेही शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हवामानात बदल झाल्याने महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल होत आहेत. त्यामुळे आठवड्याच्या उत्तरार्धात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

देशभरात सर्वच ठिकाणी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. महाराष्ट्रातील विदर्भात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही खाली गेला होता. तसेच उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, हवामानात पुन्हा एकदा बदल घडून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट आहे. सध्या पहाटेच्या सुमारास गारवा जाणवत असून धुक्याची चादर अनेक ठिकाणी दिसते. तसेच काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. त्यामुळे पहाटे व रात्री गारवा जाणवत असून दिवसा उकाडा सहन करावा लागत आहे.

आता हवामानात बदल झाल्याने येत्या दोन दिवसांत विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. पुण्यातदेखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.