देवेंद्र फडणवीसांनी गृहखाते हाती घेतल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली; सुप्रिया सुळेंचा घणाघात

supriya-sule

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत विरोधकांकडून आवाज उठवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यांच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्रई देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर तोफ डागली आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या बदल्या सातत्याने केल्या जात आहेत. पोलिसांना पारदर्शकपणे काम करु दिले जात नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्रातले प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत. गुंतवणूक होत नाही. हा महाराष्ट्रावर अन्याय होतो आहे. यावर महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकार गप्प बसले आहे. खोके सरकारकडे 200 आमदार असूनही महाराष्ट्रावर होणाऱ्या या अन्यायावर कुणीही बोलत नाही, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आंबेडकर कुटुंबाचं मोठं योगदान आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं कामही चांगलं आहे. संविधान वाचवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर काम करत आहेत. नव्या पिढीलाही त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. इंडिया आघाडीत त्यांचा मोठा रोल असेल असा मला विश्वास आहे असंही त्या म्हणाल्या.