‘हर घर नल’ कुठे आहे; 8 हजार गावांमध्ये टँकरद्वारे जल, धरणांत फक्त 28 टक्के पाणीसाठा

जल जीवन मिशनअंतर्गत ‘हर घर नल’ या योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार जोरदार जाहिरात करीत आहे, पण राज्यातल्या सध्याच्या पाणीटंचाईमुळे ‘हर घर टँकरद्वारे जल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळय़ाच्या तीव्र तडाख्याने राज्यातली धरणे आटण्यास सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्यामुळे राज्यातल्या 8 हजारांहून वाडय़ावस्त्यांना टँकरद्वारे जल असे चित्र निर्माण झाले आहे.

राज्यातील उष्णतेच्या लाटेमुळे धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने खालावत चालला आहे. मे महिन्याची सुरुवात होता राज्यातल्या सर्व लहान-मोठय़ा धरणातील पाणीसाठा 28.06 टक्क्यांवर आल्याने जलसंपदा खात्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जलसंपदा विभागाकडील आकडेवारीनुसार सर्वात गंभीर परिस्थिती पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आहे. पुण्यात धरणांचा पाणीसाठा अवघ्या 23 टक्क्यांवर आला असून छत्रपती संभाजीनगरमधील पाणीसाठा अवघा 11 टक्क्यांवर आला आहे. आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा 28.06 टक्क्यांपर्यंत आला असून गेल्या वर्षी तो 40.28 टक्के होता. यात सर्वाधिक धरणे ही छत्रपती संभाजीनगर विभागात असून येथे 920 धरणे असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 35 टक्क्यांनी घटला आहे. गेल्या वर्षी येथे 46.79 टक्के पाणीसाठा होता, तो आता फक्त 11.89 टक्क्यांवर आला आहे.

संभाजीनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई

संभाजीनगर जिह्यातील आपेगाव आणि पैठणच्या जायकवाडी धरणाची अत्यंत खाली आली असून सध्या आपेगाव धरणात 26.86 टक्के पाणी असून हे छोटे आहे, तर 102 टीएमसी पाणीसाठय़ाची क्षमता असणाऱया जायकवाडी धरणात सध्या फक्त 7.97 टक्के पाणी शिल्लक आहे. यामुळे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे.

नाशिक-पुण्यात पाणीटंचाई

पुणे आणि नाशिकमध्येही पाणीटंचाईचे संकट भेडसावत आहे. नाशिकमध्ये अवघा 30.65 टक्के पाणीसाठा असून पुण्यात तर 23.69 टक्के पाणीसाठा धरणांत आहे. पुणे विभागात 571 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून नाशिकमध्ये 653 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

संभाजीनगरात सर्वाधिक टँकर

छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 636 टँकरद्वारे 393 गावे तर 59 वाडय़ांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ जालन्यात 442, बीडमध्ये 310, नाशिकमध्ये 294, नगरमध्ये 267, सांगलीत 183, पुण्यात 169 टँकरर्सनी पाणीपुरवठा सुरू आहे.

टँकरची संख्या वाढली

राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत टँकरची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. राज्यात सध्या 2 हजार 952 टँकरद्वारे 2 हजार 344 गावे आणि 5 हजार 749 वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यातील बहुतांशी टँकर हे खासगी आहेत. खासगी टँकर 2864 तर सरकारी टँकरची संख्या 88 इतकी कमी आहे.

विभागवार धरणांतील पाणीसाठा

नागपूर 40. 43 टक्के
अमरावती 43.84 टक्के
छत्रपती संभाजीनगर 11.89 टक्के
नाशिक 30.65 टक्के
पुणे 23.69 टक्के
कोकण 42.12 टक्के

– सध्या 2344 गावे आणि 5749 वाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. उष्णतेची लाट अशीच राहिल्यास स्थिती अधिकच चिंताजनक होणार आहे.