मोदी – शहांना कान धरून जय भवानी, जय शिवाजी बोलत उठाबशा काढायला लावू; परभणीत भर पावसात उद्धव ठाकरे यांची तुफान सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नोकर असलेल्या निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या मशाल गीतमधून ‘जय भवानी’ शब्द काढायला सांगितला आहे. काढायचा का शब्द. अजिबात काढणार नाही. मोदी-शहांना कान धरून महाराष्ट्रात ‘जय भवानी, जय शिवाजी’ बोलत उठाबशा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कडाडले. महाविकास आघाडीचे परभणीतील उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्या प्रचारासाठी भर पावसात उद्धव ठाकरे यांची येथील स्टेडियमवर तुफान सभा झाली. धो धो पाऊस कोसळत असतानाच आता कितीही संकटे आली तरी चिरडून टाकणार, असा वज्रनिर्धार यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेना पाठीवर कधीच वार करत नाही. वादळालाही अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती शिवसेनेकडे आहे. वादळाच्याही छातीवर वार करणारे शिवसेनेचे मावळे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्हीही जय बजरंग बली म्हणतो, मग भाजपवाल्यांना भवानीमातेबद्दल काय आकस आहे, असा सवाल करतानाच, प्रेमाने मिठी मारलीत तेव्हा साथ दिली होती, पण पाठीत वार केलात तेव्हा माझी वाघनखे बाहेर काढली आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला बजावून सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी महिलांचा अवमान करणारे भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि मिंधे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही फटकारे ओढले. महिलांचा अवमान करणाऱयांना, त्यांना शिव्या देणाऱयांना मोदी-शहा काहीच बोलायला तयार नाहीत. महिलांचा अवमान झाला तरी चालेल, पण मते द्या असे धोरण त्यांनी अवलंबले आहे, अशी टीका करत अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातील एकही मत मिळता कामा नये, असे खणखणीत आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या आरोपावरही उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा प्रत्युत्तर दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांचा पुत्र असल्याचा मला अभिमान आहे, असे ते म्हणाले. मोदीजी, आमच्या घराणेशाहीवर बोलता तेव्हा आम्हीही तुमच्या एकाधिकारशाहीवर बोलणारच, असे त्यांनी ठणकावून सांगितले. घराणेशाही पाहिजे की नको हे आता जनताच ठरवेल, असे ते म्हणाले.

संजय (बंडू) जाधवांसारखा खासदार परभणीकरांसाठी दिल्लीमध्ये लढतोय. त्याला किती मताधिक्याने निवडून देणार असे उद्धव ठाकरे यांनी परभणीकरांना विचारले. मला मताधिक्य जास्त हवे, पण समोरच्याचे डिपॉझिट जप्त करून विजय हवा. कारण ही निवडणूक फक्त शिवसेनेची नाही तर लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. परभणीत काहीच बदललेले नाही, फक्त शिवसेनेची निशाणी बदलली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच, ‘शिवसेनेची मशाल, विजय होणार विशाल’ अशा घोषणा दुमदुमल्या. आयुष्याच्या शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार असे अभिवचन यावेळी संजय जाधव यांनी दिले.

यावेळी डॉ. फौजिया खान, अॅड. विजय गव्हाणे, माजी आमदार सीताराम घनदाट, सुरेश देशमुख, सुरेश जेथलिया, शिवाजी चोथे, राजेश राठोड यांची भाषणे झाली. याप्रसंगी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार राजेश टोपे, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार राजेश राठोड, खासदार फौजिया खान, माजी मंत्री सुरेश वरपुडकर आदी उपस्थित होते.

भाकडांची जुमला मालिका बंद करा

टीव्हीवरच्या मालिकांमध्ये हल्ली वेगवेगळे सीझन्स असतात. तशीच भाकड जनता पक्षाची ‘जुमला’ नावाची नवी मालिका देशभरात सुरू आहे. 2014 ला ‘जुमला-1’ सीझन होता. 2019 ला ‘जुमला-2’ आणि आता ‘जुमला-3’ सीझन सुरू आहे, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली. या मालिकेत अॅक्टर तोच, खलनायक तोच आणि स्टोरीही तीच आहे. शिवसेनेला वाटले होते की ही मालिका चांगली असेल, पण दहा वर्षे भाजपने देश नासवून टाकला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थितांनी ‘अब की बार, भाजप तडीपार’ अशा घोषणा दिल्या. ही मालिका आता बंद करा, ती बघून कोणाचे पोट भरलेले नाही, असे उद्धव ठाकरे यांनी खडसावले.

पाऊस आणि शिवसेनेचे वादळ

उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहताच अचानक आकाशातून पावसाचे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली आणि बघता बघता जोरदार पाऊस सुरू झाला. उद्धव ठाकरे म्हणाले, मी वादळात उभा राहणार आहे… तुम्ही उभे राहणार का? मी संकटाशी झुंज देणार आहे… तुम्ही देणार का? मी पावसात भिजणार आहे… तुम्ही भिजणार का?… तेव्हा ‘हो’ असा आवाज जनसागरातून घुमला. उद्धव ठाकरे भरपावसात बोलू लागले आणि हजारोंचा जनसमुदाय अंगावर पाऊस झेलत त्यांचे ज्वलंत विचार ऐकू लागला… वादळ अंगावर घ्यायलाही मर्दाची ताकद लागते. हे येरागबाळय़ाचे काम नव्हे. परभणीकर तर मर्द बहाद्दर! परभणीकरांना साष्टांग दंडवत, हा शिवसेनेचा बुलंद किल्ला… मर्द मावळय़ांचा हा परिसर. संकटे अंगावर घेणारा… अनेक मोठमोठी संकटे आपण चिरडली. पावसाचे संकट ते काय, असे म्हणत उद्धव ठाकरे बरसले.