भाजी चांगली झाली नाही म्हणून बायकोला जिवंत जाळलं

भाजी चांगली झाली नाही म्हणून संतापलेल्या नवऱ्याने आपल्या बायकोला जिवंत जाळल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बांदा येथे घडली आहे. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्युपूर्वी तिने दिलेल्या जबानीतून हा खुलासा झाला आहे.

बांदा शहरातील कोतवाली गावातल्या खुटल्ला परिसरात ही घटना घडली. इथे राहणाऱ्या राहुल आणि नेहा (नावे बदललेली) यांच्यात दारूवरून वारंवार भांडणं होत होती. राहुल रोज दारू पिऊन नेहासोबत भांडण करत असे. रविवारी भाजी बनवण्यावरून त्यांच्यात भांडण झालं होतं. राहुल दारू पिऊन आला होता. त्याने भाजी चांगली बनवली नसल्याची तक्रार करून नेहाला मारहाण करायला सुरुवात केली.

त्याही परिस्थितीत नेहाने त्याला नवीन भाजी करून दिली. तरीही संतापलेल्या राहुलने तिच्यावर रॉकेल टाकून तिला जाळलं. शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन तिला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी कानपूरला मोठ्या रुग्णालयात हलवलं. तिथे मृत्युपूर्वी तिने पोलिसांनी दिलेल्या जबानीत हा खुलासा केला.