पतीने केला पत्नीवर हल्ला 

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर कटरने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. हल्ला करून पळून गेलेल्या पतीला खार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत बेडय़ा ठोकल्या. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.

पीडित महिला ही पती सोबत धारावी येथे राहते. ती खारच्या 14 वा रोड येथे काम करते. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये वाद होत होते. महिला रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर आली. रात्री ती कामावरून सुटून घरी जात होती. तेव्हा तिचा पती तेथे आला. महिला बेसावध असताना त्याने पत्नीच्या गळ्यावर कटरने वार करून तो पळून गेला. महिला जखमी अवस्थेत पडल्याची माहिती स्थानिकांनी खार पोलिसांना दिली.

काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या महिलेला रुग्णवाहिकेतून एका रुग्णालयात नेले. मानेवर कटर लागल्याने महिलेचा रक्तस्त्राव झाला. तिला रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला वेळेत रक्त देखील उपलब्ध करून दिले. त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. कटर हल्ल्याची गंभीर दखल खार पोलिसांनी घेतली. वरिष्ठ निरीक्षक मोहन माने यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोर पतीला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत बेडय़ा ठोकल्या.