मतदार ‘इंडिया’सोबत, महाराष्ट्रात 35हून अधिक जागा जिंकू; माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

>> प्रसाद नायगावकर

लोकशाहीचा उत्सव सुरू असून लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील 8 जागांसह देशभरात 88 मतदारसंघात मतदान सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनीही सुपुत्र राहुल ठाकरे याच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावी हरू येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर बोलताना माणिकराव ठाकरे यांनी मतदार इंडिया आघाडीसोबत असून महाराष्ट्रात 35 अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाकडून संविधानिक संस्था नेस्तनाबूत करण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागात आणि तरुणांमध्ये बेरोजगारीमुळे मोदी सरकारविरोधात रोष आहे. यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून ते समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत. पंतप्रधानपद हे देशाचे असते, मात्र मोदी हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण होतील अशी विधाने करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.

शेतीसाठी आवश्यक गोष्टींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. शेतीमालालाही भाव नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे, असेही ते म्हणाले. तसेच भाजपकडून सरकारी कंपन्या आणि संस्था विकण्याचा धडाका सुरू आहेत. देशातील महिला सुरक्षित नाही, याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल, असा ठाम दावाही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये सर्वांमध्ये एकाप्याचे चित्र आहे. यामुळे महाराष्ट्रात आघाडीला 35हून अधिक जागा मिळतील.

दरम्यान, काँग्रेसने माणिकराव ठाकरे यांना तेलंगणा विधानसभा निवडणुकीकरिता प्रभारी बनविले होते. तेलंगणामध्ये काँग्रेसने 119 पैकी 64 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. केसीआर यांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली, मात्र तेलंगणामध्ये काँग्रेस सरस ठरली.