मनोज तिवारी क्रिकेटमधून निवृत्त

हिंदुस्थानचा दिग्गज क्रिकेटपटू मनोज तिवारीने गुरुवारी अचानक क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 37 वर्षीय तिवारीने 2015 मध्ये ‘टीम इंडिया’साठी अखेरचा सामना खेळला होता.

मनोज तिवारी सध्या बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडामंत्री आहे. त्याला गेल्या आठ वर्षांपासून ‘टीम इंडिया’मध्ये स्थान मिळालेले नाही. गेल्या मोसमात तो रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळला होता. बंगालला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात तिवारीचा मोठा वाटा होता. आज सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मनोज तिवारीने स्वतःचा एक फोटो ट्विट करून धन्यवाद लिहिले.

मनोज तिवारीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने लिहिले की, ‘क्रिकेटला अलविदा. या खेळाने मला सर्व काही दिले आहे. ज्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता तेही मला मिळाले. मी या खेळाचा आणि देवाचा सदैव ऋणी राहीन, जो नेहमी माझ्या पाठीशी असतो. माझ्या क्रिकेटच्या प्रवासात ज्यांनी भूमिका बजावली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या लहानपणापासून ते गेल्या वर्षापर्यंत माझ्या सर्व प्रशिक्षकांचेही आभार. वडिलांसमान असलेले गुरू मानबेंद्र घोष यांचे मनोज तिवारीने विशेष आभार मानले.’

मनोज तिवारीने ‘टीम इंडिया’साठी 12 एकदिवसीय आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वन डेमध्ये त्याने 26.09च्या सरासरीने 287 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. वन डे फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 104 होती. टी-20 इंटरनॅशनलबद्दल बोलायचे झाले तर त्याने 15च्या सरासरीने 5 धावा केल्या आहेत. मनोज तिवारीने करिअरच्या सुरुवातीलाच सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, मात्र तो ‘टीम इंडिया’मध्ये जास्त काळ राहू शकला नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पश्चिम बंगालकडून खेळताना त्याने 141 सामने खेळले. त्यात 29 शतके व 45 अर्धशतकांसह 9908 धावा फटकावल्या, तर 32 विकेटही घेतल्या. तिवारीने 169 लिस्ट ‘ए’ सामन्यांमध्ये 6 शतके आणि 40 अर्धशतकांसह 5581 धावा केल्या. याचबरोबर 63 विकेटही घेतल्या.

आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी

‘टीम इंडिया’शिवाय मनोज तिवारीने आयपीएलमध्येही प्रभावी कामगिरी केली. तो आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट आणि किंग्ज इलेव्हन पंजाब अशा चार संघांकडून खेळला. यादरम्यान त्याने 98 आयपीएल सामन्यांत 28.72 च्या सरासरीने 1,695 धावा फटकावल्या असून त्यात 7 अर्धशतकांचाही समावेश आहे.