मुंबईमधील मराठा समाज, खुल्या प्रवर्गांचे 100 टक्के सर्वेक्षण पूर्ण

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून मुंबईत सुरू करण्यात आलेले सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मुंबईत 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले असून 100 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले. या सर्वेक्षणात 3 लाख 58 हजार 624 घरांनी सर्वेक्षणाला नकार दिला, 5 लाख 82 हजार 515 घरांना टाळे असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या कामात पालिकेच्या कर्मचाऱयांनी 38 लाख 79 हजार 46 घरांचे सर्वेक्षण केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

राज्य मागासवर्ग आयोगाने पाठविलेल्या ‘मास्टर ट्रेनर’ने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नोडल ऑफिसर, असिस्टंट नोडल ऑफिसर व मास्टर ट्रेनर यांनी महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाला सर्वेक्षणासाठीचे प्रशिक्षण दिले होते. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते. सर्वेक्षणा दरम्यान एकूण 160 ते 182 प्रश्न असून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्यात आली. सदर माहिती मूलभूत, काwटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक होती. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेण्यात आली नाही. ही कार्यवाही उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे व कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

असे झाले सर्वेक्षण
23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी
एकूण सर्वेक्षण – 38,79,46
सर्वेक्षणाला नकार – 3,58,624
घरांना टाळे – 5,82,515