दादा उपचार घ्या… मराठा समाजाची आर्त हाक; अखेर मनोज जरांगे उपचारास तयार

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असून अशक्तपणाही वाढला आहे. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने चिंता वाढली होती. दादा उपचार घ्या, अशी आर्त हाक मराठा समाजाने दिली. त्यानंतर जरांगे यांनी उपचार घेण्यास होकार दिल्याने डॉक्टरांनी त्यांना सलाईन तसेच इंजेक्शन दिले. दरम्यान, जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठवाडय़ात गुरुवारीही ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा गुरुवारी सहावा दिवस होता. अन्न तसेच पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांचा आवाज क्षीण झाला आहे. काल नाकातून रक्तस्राव झाल्याने नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज तसेच डॉ. विनोद चावरे यांनी त्यांना जबरदस्तीने सलाईन दिले होते. परंतु ते सलाईन जरांगे यांनी काढून टाकले. आज सकाळपासूनच त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवत होता. जरांगे यांची तडफड पाहून तेथे उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांना पाणी घेण्याचा आग्रह केला. परंतु त्यांनी पाणी घेण्यास नकार दिला. उपचारासाठी आलेल्या आरोग्य पथकाला जरांगे यांनी हातही लावू दिला नाही.

पाणी पाहून डोळय़ात पाणी आले…

मनोज जरांगे ऐकत नसल्यामुळे नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आणि नेकनूर संस्थानचे महंत व्यंकट स्वामी हे उपोषणस्थळी आले. त्यांनी महप्रयासाने जरांगे यांना पाणी दिले; परंतु पाणी घशाखाली उतरले नाही. पाणी पाहून मनोज जरांगे यांच्या डोळय़ात पाणी आले. गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉ. विनोद चावरे हे जरांगे यांना उपचार घेण्यासाठी विनवणी करत होते. परंतु जरांगेंनी त्यांनाही दाद दिली नाही. अखेर उपोषणस्थळी जमलेल्या मराठा बांधवांनी उपचार घेण्यासाठी प्रचंड आळवणी केली. त्यानंतर जरांगे यांनी उपचार घेण्यास होकार दिला. सलाईन आणि काही इंजेक्शन दिल्यानंतर जरांगे यांची प्रकृती स्थिरावली.

आंतरवालीत पुन्हा गर्दी

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधवांनी आंतरवालीकडे धाव घेतली आहे. यात महिलांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. आज दिवसभर उपोषणस्थळी समाजबांधव मनोज जरांगे यांच्याकडे उपचार घेण्यासाठी विनवणी करत होते.