मराठा आंदोलक मनोज जरांगेवर बळजबरीने उपचार सुरू, महंतांच्या आदेशावरून डॉक्टरांनी लावले सलाईन

गुरुवारी सकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होऊन त्यांची तबेत खालवली होती. त्यामुळे बीड येथील नायराणगडचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या आदेशानंतर डॉ. चावरे यांनी बळजबरीने त्यांना सलाईन लावले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत.

गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणादरम्यान जरांगे पाटील यांनी पाणी आणि औषधोपचाराचा त्याग केला. मात्र आज 14 फेब्रुवारी रोजी सकाळपासून जरांगे यांची तब्येत खालावली होती. त्यांच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला होता.नाकातून रक्तस्राव होऊनही जरांगे पाटील उपचार घ्यायला तयार नव्हते. अखेर बीड जिल्ह्यातील नारायणगड संस्थानचे महंत मठाधिपती शिवाजी महाराज यांनी व छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलचे डॉ.विनोद चावरे हे उपोषणस्थळी आले आणि त्यांनी जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली तरीही जरांगे पाटील ऐकायला तयार नव्हते. अखेर शिवाजी महाराज यांनी जरांगे यांच्यावर नियमित उपचार करणार्‍या डॉ.विनोद चावरे यांना सूचना करत बळजबरीने सलाईन लावण्यास सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी जरांगे यांना अखेर सलाईन लावून त्यांच्यावर उपचार सुरू केले.

बीड येथील नारायणगडचे मठाधिपती शिवाजी महाराज यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह समस्त मराठा समाज मोठ्या प्रमाणात असुन कोणीही काहीही वेगळे आंदोलन करु नये शांत राहण्याचे आवाहन केले.