अधिकाऱ्यांची शिष्टाई असफल; कोपर्डीकरांचे आंदोलन सुरूच

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कोपर्डी ग्रामस्थांचे आंदोलन दुसऱयादिवशी सुरूच आहे. आंदोलन मागे घेण्यासाठी आज सरकारी अधिकाऱयांनी केलेली शिष्टाई असफल झाली. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे.

आज सकाळी महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन स्थगित करण्याची केलेली विनंती आंदोलकांनी फेटाळून लावली. आरक्षण मिळाल्यानंतरच आंदोलन स्थगित करण्याचा निर्धार ग्र्रामस्थांनी केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच निर्भयाच्या कुटुंबीयाला न्याय द्यावा, यांसह विविध मागण्यांसाठी आज दुसऱया दिवशीही ग्रामस्थांचे उपोषण सुरूच होते. या आंदोलनामध्ये आजही मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आज सकाळी आंदोलनामध्ये पुन्हा विद्यार्थी सहभागी झाले होते.

शिवसेनेचा पाठिंबा

शिवसेनेचे नगर दक्षिणचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. तालुकाप्रमुख बळीराम यादव, विभाग संपर्कप्रमुख जगदीश चौधरी यांच्यासह शिवसैनिक आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. सरकारने तत्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी दळवी यांनी केली. तसेच हे संवेदना नसलेले, खोक्यांनी तयार झालेले सरकार आहे. शांततेने आंदोलन करणाऱया मराठा आंदोलकांवर यांनी लाठीहल्ला केला. याची मोठी किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशारा दळवी यांनी दिला.