मनोज जरांगे यांचे आज मुंबईकडे कूच

54 लाख नोंदी सापडल्याचे सांगतात, पण प्रमाणपत्र मात्र एकालाही दिले नाही. आता आरक्षणाची लढाई मुंबईतच होणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय एकही मराठा माघारी फिरणार नाही, असा निर्धार आज मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक शनिवारी सकाळी 9 वाजता आंतरवाली येथून प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे हे पत्रकारांशी बोलत होते.

राज्य सरकारने आता कोणताही आंतरवालीसारखा प्रयोग करण्याचे मनातही आणू नये, असा इशारा देतानाच त्यांनी उपोषण सोडण्यासाठी पाच-सहा मंत्री आले होते. हे मंत्री आता कुठे लपून बसले आहेत. या मंत्र्यांनीच मराठा समाजाची फसवणूक केली, असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केला.

आंदोलनाची ताकद मुंबईतच समजेल

आम्ही आंतरवालीतून सकाळी 9 वाजता निघणार. सुरुवातीला आंदोलकांची संख्या कमी असेल पण खऱया ताकदीचे प्रदर्शन मुंबईतच होईल, असा विश्वासही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत 26 जानेवारी रोजी मुंबईत आझाद मैदानावर माझे उपोषण सुरू होणार, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. आरक्षणासाठी ही आरपारची लढाई असून, राज्यातील सर्व मराठय़ांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

  • मुंबईचा प्रवास ठरल्याप्रमाणेच होईल, त्यात कोणताही बदल होणार नाही.
  • ज्यांना मुंबईला येणे शक्य नाही त्यांनी रस्त्यात चहा, पाण्याची सोय करावी.
  • पनवेलपर्यंत वाहनांची संख्या पाच ते सहा असेल. तेथून पुढे मुंबईत 10 ते 12 लाख वाहने येतील.
  • पहिल्या दिवशी उपोषणस्थळी महिलांची संख्या कळेल.

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

रत्नपूर येथून आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा ट्रक्टरच्या ट्रॉलीवर बसवण्यात आला आहे. हा पुतळा 15 फुटांचा आहे. हा अश्वारूढ पुतळा अग्रभागी राहणार असून, त्या पाठीमागे आंदोलक आणि त्यांची वाहने असतील, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.