आंदोलकांवर कारवाईचा बडगा, मनोज जरांगेंसह एक हजार मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे; मिंधे सरकारला आंदोलनाचा धसका

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपांच्या फैरी झाडत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच पोलीस परवानगीशिवाय आंदोलन केल्याचे कारण देत जरांगे यांच्यासह 1 हजार 41 आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जरांगे यांच्यावर बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अमळनेर या दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीचेच गुन्हे मागे घेतले गेले नसताना नव्याने गुन्हे दाखल झाल्याने मराठा आंदोलक आणि सरकारमध्ये खटके उडण्याची चिन्हे आहेत.

रविवारी मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी मराठवाडय़ात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. अचानक झालेल्या या रास्ता रोकोसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती, असे कारण पुढे करून पोलिसांनी ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले. खुद्द मनोज जरांगे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. बीड जिल्हय़ातील वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यांत 22 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हय़ात एकूण 425 गुन्हे दाखल झाले असून पाटोदा तालुक्यातील अंमळनेर आणि शिरूर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरांगे यांच्या आवाहनावरून रास्ता रोको करण्यात आल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तीन जिल्ह्यांत इंटरनेट बंद
मराठा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेत आज तडकाफडकी मराठवाडय़ातील बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिह्यांत दहा तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. बीड येथून छत्रपती संभाजीनगर, जालन्याकडे जाणारी एसटी सेवाही बंद ठेवली होती. बीड आणि जालना जिह्याची सीमाही सील करण्यात आली आहे.

…तर परिणामांना सामोरे जावे लागेल; मिंधेंच्या मंत्र्याची धमकी
राज्य सरकारमधील नेत्यांविरोधात एकेरी उल्लेख जरांगे पाटलांनी थांबवला नाही, तर त्यांना त्याचे भविष्यात होणाऱया परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही राज्याचे उत्पादन शुल्क शंभुराज देसाई यांनी आज मनोज जरांगे पाटील यांना दिला. गृहमंत्रीपदासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या नेत्याच्या विरोधात वक्तव्य करून आव्हान दिले जात असेल तर कायदा कायद्याचे काम करेल. त्यांची सगळी वक्तव्ये तपासली जातील. त्यांच्या सगळय़ा वक्तव्यांची चौकशी केली जाईल, असे शंभुराज देसाई म्हणाले.

‘लिमिटच्या बाहेर गेले तर आपण कार्यक्रम करून टाकतो’ मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा कुणाला?
‘ते सामान्य कार्यकर्ते होते तोवर ठीक होतं, आता नाही. आपल्या लिमिटच्या बाहेर गेले तर आपण कार्यक्रम करून टाकतो’ असा संवाद असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधान भवनाच्या पायऱयांवरील व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. शिंदे यांनी केलेले हे विधान मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल होते की अन्य कुणाबद्दल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची विधान भवनाच्या पायऱयांवर भेट झाली तेव्हा त्यांच्यात हा संवाद घडल्याचे व्हिडीओत दिसत आहे. ‘हे काय चाललेय? तुम्हीच त्यांना मोठे केलेय,’ असे पटोले यांनी शिंदेंना विचारले. त्यावर एका हाताने चष्मा सरळ करतानाच हातवारे करत शिंदे यांनी वरील उत्तर दिले. त्यानंतरही दोघांमध्ये संवाद सुरू होता, परंतु तो व्हिडीओमध्ये स्पष्ट ऐकू येत नाही. त्यामुळे दोघांमध्ये नेमकी कुणाबद्दल चर्चा चालू होती हे स्पष्ट होत नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱयांवर जोरदार आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्दय़ावरून आक्रमक होत ‘फसवणूक नको आरक्षण द्या’, ‘महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ अशा जोरदार घोषणांनी विरोधकांनी विधान भवनाचा परिसर दुमदुमून टाकला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱयांवर निदर्शने केली. शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, राजन साळवी, नरेंद्र दराडे, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.

17 दिवसांनंतर उपोषण स्थगित
मला सलाईनमधून विष देण्याचा किंवा माझे एन्काउंटर घडवून आणण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. ‘सागर’ बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा देत जरांगे रविवारी मुंबईकडे निघाले होते. रात्री त्यांनी भांबेरी गावात मुक्काम केला. त्यानंतर आज सकाळी लोकांच्या विनंतीवरून ते माघारी परतले व त्यांनी उपोषण स्थगित केले. साखळी उपोषण सुरू ठेवण्यात येईल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

जरांगेंच्या सहकाऱयांची धरपकड
जरांगे यांच्या सहकाऱयांची धरपकड सुरू आहे. जरांगे यांचे निकटवर्तीय श्रीराम कुरणकर, शैलेश पवार, बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

फडणवीसांना दुसरे आंतरवाली सराटी घडवायचे होते  – जरांगे
जरांगे यांनी आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत निशाणा साधला. काल रात्री येथे पाच हजार महिलांसह 25 हजार लोक होते. रात्रीत फडणवीसांना दुसऱयांदा आंतरवाली सराटीसारखी लाठीहल्ल्याची घटना घडवून आणायची होती. लाठीहल्ला झाला असता तर जमलेले लोक सैरावैरा पळाले असते. त्यासोबतच मराठा समाज पेटून उठला असता. त्यामुळेच मी संयमाची भूमिका घेतली. राज्य बेचिराख होण्यापासून वाचवलं, असे जरांगे म्हणाले.