मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित, कोणत्याही परिस्थितीत माघार नाही; मनोज जरांगे यांची घोषणा

मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित करत असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच आंतरवली सराटी येथील आंदोलनस्थळाचा मंडप काढण्यासाठी पोलिसांची दडपशाही सुरू असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे. आम्हांला 10 टक्के आरक्षण नको, आता जेलमध्ये टाकले तरी मागे हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्याचे काम सरकारने महिन्याभरापासून बंद केले आहे. सरकार आपल्याशी दगाफटका करत आहे. उच्च न्यायालयाने आपल्याला शांततेत रास्ता रोको करण्याची परवानगी दिली होती. तो आपला अधिकार आहे. आपण शांततेत रास्ता रोको करत असतानाही गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. हा आपल्यावर अन्याय आहे. तसेच 10 टक्के आरक्षण स्वीकारावे, असे त्यांचे म्हणणे म्हणजे आपल्यावर मोठा अन्याय असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षण घ्यायचे आहे, त्यांनी घ्यावे, त्याला आपला विरोध नाही. मात्र,ओबीसीतून आरक्षण ही राज्यातील मराठा समाजाची मागणी आहे.

इंग्रजानीही केली नसेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात सध्या दडपशाही सुरू आहे. गृहमंत्र्यांकडून मराठ्यांचा द्वेष दिसत आहे. इंस्टाग्रामवर बंदूक टाकणे, मराठ्यांना खुन्नस दाखवणे. त्यांनी काहीही करू द्या, आपण कशालाही घाबरत नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही. मला जेलमध्ये टाकून सडवले तरी मी मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

मला अटक केली तरी समाजासाठी मी आमरण उपोषण करणार आहे. जेल असो, आंतरवली असो, मी कुठेही उपोषण करणार आहे. मी तडफडून मरायला तयार आहे. मात्र, माघार घेणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.