मॉरिशसमध्ये मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा होणार जागर

कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’चे सतरावे पेंद्रीय मराठी साहित्य संमेलन येत्या 2 व 3 डिसेंबर रोजी मॉरिशस येथे होणार आहे. दोनदिवसीय संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा जागर मॉरिशसच्या भूमीवर होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक-लेखक विजय कुवळेकर यांची निवड करण्यात आली आहे.

‘कोमसाप’ ही संस्था मराठी भाषा व साहित्याच्या प्रसारासाठी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक ‘पद्मश्री’ मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर विविध साहित्य संमेलने व साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांद्वारे ‘कोमसाप’ मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी अखंडपणे सक्रिय आहे. यंदा कोकण मराठी साहित्य परिषदेला मॉरिशस येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याकरिता निमंत्रित केले आहे. मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन तसेच मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे नामकरण ‘आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन’ असे करण्यात आले आहे.

ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रकाशन आणि बरंच काही
या दोनदिवसीय संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रकाशन व प्रदर्शन, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार असून त्यानंतर ‘देशविदेशातील मराठी भाषेचे जतन’ या विषयावरील परिसंवाद आणि निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. दुसऱया दिवशी ‘वाचन ः बदलता दृष्टिकोन आणि स्वरूप’ या विषयावरील परिसंवादाबरोबरच मान्यवरांच्या मुलाखती तसेच कलाविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांची सत्रे संपन्न होणार आहेत.