‘मराठी पाऊल पडते पुढे’चा 4000वा प्रयोग दिमाखात

मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा ‘मराठी पाऊल पडते पुढे’चा 4 हजारावा भव्यदिव्य प्रयोग 6 ऑगस्ट रोजी परळ येथील दामोदर नाटयगृहात दिमाखात पार पडला. आजी माजी 70हून अधिक कलाकारांच्या संचात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

कलारंजना मुंबई निर्मित ‘मराठी पाऊल पडते पुढे ’ हा कार्यक्रम म्हणजे उदय साटम यांची संकल्पना आणि दिग्दर्शन. गेली 32 वर्षे हा कार्यक्रम रसिकांचे मन जिंकून घेत आहे. रविवारच्या विक्रमी प्रयोगानिमित्त मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता महासंघाने उदय साटम यांचा विशेष सन्मान केला. यावेळी कलारंजना संस्थेच्यावतीने कार्यक्रमातील आजी-माजी कलावंतांना गौरविण्यात आले.

कलारंजन संस्थेतील ज्येष्ठ कलावंत रविमामा खानोलकर यांना कलाकारांच्यावतीने 51 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करून गौरवण्यात आले. आमदार सुनील राऊत यांनीदेखील त्यांना 25 हजार रुपयांची मदत केली. यावेळी काँग्रेसचे राजू वाघमारे, जनरल एज्युकेशन इन्स्टिटय़ूटचे शैलेंद्र साळवी, सोशल सर्व्हिस लीगचे जनरल सेक्रेटरी मंत्री, अभिनेता सुशांत शेलार, गायक नंदेश उमप आदी उपस्थित होते.

गेली 32 वर्षे सर्व कलाकार, सहकारी, मित्रपरिवार आदींच्या सहकार्यामुळे आणि रसिक प्रेक्षकांच्या साद प्रतिसादामुळे आज 4 हजार प्रयोगांचा पल्ला गाठू शकलो. अनेक दिग्गज कलावंत या रंगमंचावर होऊन गेले आहेत आणि त्यांचीच परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न माझ्यासारखा एक लहान कलाकार करीत आहे. त्या प्रयत्नांना तुम्ही सर्वांनी दाद दिली त्याकरिता सर्वांचे मनापासून आभार मानतो.
– उदय साटम, निर्माता