सचिनच्या पुतळ्याचे अनावरण 15 नोव्हेंबरला?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या भव्य आणि दिव्य पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण येत्या वर्ल्ड कपदरम्यान वानखेडे स्टेडियमवर केले जाणार आहे. मात्र सर्वांना उत्सुकता आहे की सचिनचा हा पुतळा त्याच्या नेहमीच्याच बॅट उंचावून आकाशाकडे पाहाणाऱ्या आयकॉनिक पोझमध्ये असेल की अन्य दुसऱ्या पोझमध्ये ? मात्र याबाबत एमसीएच्या सूत्रांकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही. तसेच या पुतळ्याचे अनावरण हिंदुस्थानच्या साखळी सामन्यादरम्यान होणार की उपांत्य सामन्यादरम्यान, याबाबतही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी 15 नोव्हेंबरला पुतळ्याचे अनावरण होण्याची दाट शक्यता असल्याचे कळले आहे.

सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त मुंबई क्रिकेट संघटनेने वानखेडेवर सचिनचा कास्य पुतळा उभारणार असल्याचे जाहीर करून सचिनला आगळीवेगळी भेट दिली होती. सध्या सचिनचा पुतळा बनविण्याचे काम जोरात सुरू असून सचिनचा पुतळा वानखेडे स्टेडियममध्ये गरवारे पॅव्हेलियनसमोर उभारला जाणार आहे. पुतळय़ाच्या उंचीबाबत आणि पोझबाबत एमसीएने गोपनीयता पाळली आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

पदार्पण, निरोप आणि कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण वानखेडेवरच

सचिन आपल्या कारकीर्दीतील पहिला  आणि अखेरचा सामना वानखेडे स्टेडियमवरच खेळला होता. सचिनने आपल्या रणजी कारकीर्दीचे पदार्पण 1988 साली वानखेडे स्टेडियमवरच केले होते आणि आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय आणि कसोटी सामना वानखेडेवरच खेळला होता. तसेच सचिनने याच मैदानात हिंदुस्थानला जगज्जेतेपद जिंकून दिले होते. अशा ऐतिहासिक, संस्मरणीय आणि सर्वोत्तम क्षणांचा साक्षीदार असलेल्या वानखेडेवरच सचिनचा पूर्णाकृती पुतळा उभारणे ही एक गौरवाचीच बाब आहे. तसेच आजवर हिंदुस्थानात एकाही क्रिकेटपटूचा पूर्णाकृती पुतळा अद्याप उभारण्यात आलेला नाही. या ऐतिहासिक गोष्टीचा श्रीगणेशा सचिनच्याच पुतळय़ाने होणार असल्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटसाठी अभिमानाची गोष्ट ठरणार आहे.

15 नोव्हेंबरच का ?

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱया वर्ल्ड कपदरम्यान वानखेडेवर एकंदर पाच सामने खेळविले जाणार आहेत. मात्र त्यापैकी केवळ एकच सामना हिंदुस्थान खेळणार आहे. उर्वरित लढती अन्य संघांमध्ये खेळल्या जाणार आहेत. मात्र वानखेडेवर 15 नोव्हेंबरला पहिली उपांत्य लढत खेळविली जाणार आहे. या लढतीत नेमके कोणते संघ खेळणार आहेत हे तेव्हाच कळू शकेल. पण 15 नोव्हेंबर हा दिवस सचिन तेंडुलकरसाठी ऐतिहासिक आणि संस्मरणीय असाच आहे.

 याच दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर 1989 साली सचिन तेंडुलकर नावाच्या क्रिकेटच्या देवाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात आपले पाऊल ठेवले होते आणि त्याच तारखेला म्हणजे 15 नोव्हेंबर 2013 साली तो आपल्या समारोपाच्या कसोटीत फलंदाजीसाठी शेवटच्या वेळी मैदानात उतरला होता. ती कसोटी योगायोगाने वानखेडेवरच खेळली गेली होती. त्यामुळे सचिनच्या क्रिकेट कारकीर्दीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या 15 नोव्हेंबरलाच योगायोगाने वानखेडेवर पहिला उपांत्य सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे सचिनच्या पुतळय़ाच्या अनावरणासाठी त्यापेक्षा दुसरा कोणताही चांगला दिवस किंवा मुहूर्त असूच शकत नाही. तसेच यादिवशी हिंदुस्थानचा संघ उपांत्य सामना खेळत असेल तर तो दिवस पुतळा अनावरणासाठी दुग्धशर्करा योगच ठरू शकतो. सचिनसाठी माईलस्टोन असलेल्या या दिवशी पुतळय़ाच्या अनावरणाचाही योग एमसीए साधेल आणि सचिनच्या 50 व्या जन्मदिनाच्या सरप्राइज गिफ्टला संस्मरणीय करेल, असा विश्वास तमाम क्रिकेटप्रेमींना आहे.