बाळाला सोडून गेलेल्या आईची कोर्टात धाव; पतीला मुलाचा ताबा देण्यावर आक्षेप

बाळाला पोलिसांच्या ताब्यात देऊन दुसरा विवाह करणाऱया महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आधीच्या पतीला मुलाचा ताबा देण्यावर या महिलेला आक्षेप आहे. त्याबाबत तिला आपले म्हणणे न्यायालयासमोर सादर करायचे आहे.

न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आम्ही तुम्हाला म्हणणे मांडण्याची संधी देऊ, पण जे कायद्याच्या चौकटीत आहे त्यानुसारच आदेश देऊ. बाळाचा ताबा मिळावा म्हणून वडिलांनी याचिका केली होती त्याप्रमाणे वडिलांना मुलाचा ताबा मिळाला आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी 21 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे.

आई सोडून गेलेल्या 18 महिन्यांच्या बाळाचा ताबा वडिलांकडे दिला असल्याची माहिती बाल कल्याण समितीने गेल्या शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली. या बाळाचा जन्म आंतरधर्मीय विवाहातून झाला. बाळाची आई मुस्लीम असून वडील हिंदू आहेत. पती, पत्नी व मुलगा सहा महिने एकत्र राहिले. हा विवाह मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. त्यांनी मुलाविरोधात साकीनाका पोलिसांत अपहरणाची तक्रार केली. पतीला अटक झाली. पत्नी तिच्या कुटुंबीयांसोबत निघून गेली. तिने बाळाला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तिने दुसरा विवाह केला.

पोलिसांनी बाळाला माटुंगा येथील निवारा केंद्रात ठेवले. बाळ बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले. आईने कायदेशीररीत्या ताबा सोडल्याने बाळाला दत्तक समितीकडे देण्यात आले. त्यावेळी पतीच्या आईने मुलाचा ताबा घेण्यासाठी बाल कल्याण समितीकडे अर्ज केला. माझा मुलगा कारागृहात आहे. त्याच्या बाळाचा ताबा मला द्यावा, अशी विनंती आईने समितीकडे केली. समितीने विनंती मान्य केली नाही. त्याचदरम्यान एका कुटुंबाने त्या बाळाला दत्तक घेतले. दत्तक समितीने त्याची सर्व प्रक्रिया पार पाडली.

न्यायालयाने कान उपटताच…
बाळाचे वडील कारागृहातून आल्यानंतर त्यांनी मुलाचा ताबा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पत्नीने दुसरा विवाह केला आहे. त्यावर माझा काही आक्षेप नाही. तिने बाळावरील हक्क सोडला आहे. मी त्या बाळाचा बाप आहे. बाळाचा ताबा मला देण्यात यावा व दत्तक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी वडिलांनी याचिकेत केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने या बाळाचा ताबा वडिलांना देणार की नाही, अशी विचारणा समितीकडे केली होती. न्यायालयाने कान उपटल्यानंतर समितीने बाळाचा ताबा वडिलांकडे दिला.