टेन्शन! मुंबईची हवा विषारी फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका, सरकारचा रेड अ‍ॅलर्ट

मुंबईसह राज्यातील विविध शहरांमधील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्य खात्याने रेड अॅलर्ट जारी केला आहे. फटाके पह्डणे टाळावे, बंद घरात अगरबत्ती लावू नये, झाडू मारण्याऐवजी ओल्या कपडय़ाचा वापर करावा, धूम्रपान करू नये, अशा गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. श्वसनाचे विकार आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी एन-95 मास्क वापरा असा सल्लाही देण्यात आला आहे.

हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात वातावरणातील प्रदूषित वायू व धुलिकण यामुळे हवेची गुणवत्ता खराब होते आणि या प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
कोरोना काळात जशी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले होते तशीच काळजी आता घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील 17 शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे होणाऱया तीव्र आजारांचे आणि प्रत्येक शहरातील रुग्णालयाच्या आपत्कालीन युनिटमध्ये श्वसनांच्या तीव्र आजारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

प्रदूषणाचा धोका कोणाला…

पाच वर्षांखालील बालके आणि वृद्ध व्यक्ती, गरोदर महिलांनाही वायुप्रदूषणाचा धोका आहे. कारण गरोदरपणात दूषित हवेचा परिणाम गर्भावर होऊ शकतो. श्वसन व ह्रदयविकाराचे रुग्ण, दुर्धर आजार असलेल्या व्यक्ती, वाहतूक पोलीस, वाहतूक स्वयंसेवक, बांधकाम कामगार, रस्ते सफाई कामगार, रिक्षाचालक, रस्त्यावरील विव्रेते, प्रदूषणात काम करणारे कामगार, स्वयंपाकासाठी गोवऱ्या व लाकूड जाळणाऱ्या महिला.

फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका

प्रदूषणामुळे श्वसन, हृदय व रक्तवाहिन्यांचे तीव्र आजार, फुप्फुसांचा कर्करोग आणि अकाली मृत्यूचा धोका.

एक्यूआय हवेची गुणवत्ता आरोग्यावर परिणाम

0-50 चांगली अतिशय कमी परिणाम
51-100 समाधानकारक आजारी व्यक्तींना श्वसनास त्रास
101-200 मध्यम फुफ्फुस, दमा, हृदयविकार असलेल्यांना त्रास
201-300 खराब सर्वांना श्वसनास त्रास
301-400 अतिशय खराब श्वसनविकाराचा धोका
401-500 चिंताजनक निरोगी व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम

हे आजार होऊ शकतात

खोकला, घरघर, डोळे, नाक व घशात जळजळ, अस्वस्थता, श्वसन नलिकेचे तीव्र विकार, श्वसनमार्गाची जळजळ व संसर्ग, दम्याचा त्रास, बाँक्राँयटीस, हृदयरोग, सेरेब्रोव्हस्क्युलर स्ट्रोक.

या 17 शहरांना नियमावली लागू

मुंबई, नवी मुंबई, नाशिक, अमरावती, सांगली, सोलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, अकोला, बदलापूर, उल्हासनगर, संभाजीनगर, पुण, नागपूर, चंद्रपूर

ही काळजी घ्या

मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉक टाळा. तूर्त व्यायाम नको.
उघडय़ावर कचरा जाळू नका.
सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत खिडक्या आणि दरवाजे बंदच ठेवा.
नियमितपणे पाण्याने डोळे धुवावेत, कोमट पाण्याने नियमित गुळण्या कराव्यात.
दुपारी बारा ते चार या वेळेत बाहेर पडू नका.

आजची हवेची गुणवत्ता

मुंबई 148
ठाणे 151
भाईंदर 156
भिवंडी 112

मास्क वापरा

एन 95 किंवा एन 99 मास्क वापरावेत. कागदी मास्क, रुमाल, स्कार्फ व कापड प्रभावी नाही.