चांद्रयान मोहीम…क्षण अभिमानाचा, मुंबईच्या गडकोट ट्रेकर्सची अनोखी सलामी

इस्रोने 14 जुलै रोजी आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण केले. हिंदुस्थानचे चांद्रयान अंतराळात झेपावले आणि तमाम देशवासीयांचा उर अभिमानाने भरून आला. हा अभिमान फक्त एका दिवसापुरता नसावा म्हणून रविवारी 16 जुलै रोजी गडकोट ट्रेकर्स, मुंबई या ग्रुपने विसापूर किल्ला येथे खास सेलिब्रेशन केले. देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेलेल्या दिवसाची आठवण जागवली आणि मोहिमेला विजयी भवंच्या शुभेच्छा दिल्या.

गडकोट ट्रेकर्स, मुंबई हा ट्रेकिंग ग्रुप डिसेंबर 2018 मध्ये रायगड किल्ला येथे मानवंदना देऊन स्थापन करण्यात आला. तरुण पिढीला ट्रेकिंगविषयी असणारे प्रेम पाहून त्यांना गडांचा इतिहास समजावून सांगणे हा ग्रुपचा उद्देश आहे. गडकोट ट्रेकर्समध्ये पाच उत्तम ट्रेक करणारे आणि सगळय़ांना व्यवस्थित गाइड करणारे लीडर आहेत. पुरुष, महिला असे तरुण आणि वयस्कर मंडळी गडकोटच्या ट्रेकिंग मोहिमेत सहभागी होतात.

गडकोट ट्रेकर्सने 16 जुलै रोजी विसापूर किल्ला येथे ट्रेकिंगचे नियोजन केले होते. यामध्ये 15 महिला आणि 25 पुरुषांचा समावेश होता. मोहिमेत एक दिव्यांग मुलगा सहभागी होता. अमोल आग्रे, प्रकाश रेडेकर, किशोर पवार, सनी सुर्वे, साक्षी आंबेकर हे गडकोट ट्रेकर्सचे गुप लीडर आहेत.