मऱ्हाटमोळ्या देशी खेळांसाठी मुंबईचा राजा मैदानात; कबड्डी आणि मल्लखांबाच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

मुंबईच्या गणेशोत्सवाला जागतिक उंची गाठून देणाऱ्या मुंबईचा राजा अर्थातच लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने मऱ्हाटमोळ्या देशी खेळांची आजच्या पिढीमध्ये आवड निमार्ण व्हावी, आपल्या खेळांबद्दल आपुलकी वाढावी म्हणून कबड्डी आणि मल्लखांब या खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. येत्या 21 ते 27 एप्रिलदरम्यान हे शिबीर गणेश गल्लीच्या गणेश मैदानात भरविले जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी दिली.

मुंबईच्या गणेशोत्सवाला सर्वोच्च उंचीवर नेताना बावीस फुटी मूर्तीची स्थापना करणारे लालबाग उत्सव मंडळ आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमुळे प्रसिद्ध आहेच, पण ते आता क्रीडा क्षेत्रातही जोरदार चढाई करणार आहेत. गिरणगावातीलच नव्हे, तर मुंबईतील मुलांमध्ये जागतिक स्तरावर पोहोचलेल्या मऱहाटमोळय़ा कबड्डी आणि मल्लखांब खेळांविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून सात दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. सध्याच्या शालेय मुलांमध्ये खेळांच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक संतुलनही राखता येते. खेळामुळे आयुष्यालाही शिस्त लाभते या हेतूने मल्लखांब आणि कबड्डीचे मार्गदर्शन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेले खेळाडू गणेश गल्लीत अवतरणार आहेत.

प्रो कबड्डीत आपल्या खेळाने दबदबा निर्माण करणारे रिशांक देवाडिगा, विशाल माने, प्रणय राणे, नीलेश शिंदेसारखे अनेक स्टार कबड्डीपटू मुलांना खेळाचे धडे देण्यासाठी येणार असल्याची माहिती मंडळाचे सरचिटणीस स्वप्निल परब यांनी दिली. तसेच सुधीर देशमुख, आनंदा शिंदे, रक्षा नारकर आणि पौर्णिमा जेधे हे कबड्डीपटूंना कबड्डीची बाराखडी शिकवणार आहेत. एवढेच नव्हे तर, मल्लखांबाच्या शिबिरात लक्षवेधी कामगिरी करणाऱया खेळाडूंना ऋतुराज ऍकेडमीच्या वतीने वर्षभर मार्गदर्शन दिले जाणार आहे.

हे शिबीर 5 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी असून शिबिराच्या नोंदणीसाठी मुंबईचा राजाच्या गणेश गल्लीतील कार्यालयात 19 एप्रिलपर्यंत संपर्क साधता येणार आहे. या शिबिरात शेकडो मुला-मुलींना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था मंडळाच्या वतीने उभारण्यात आल्यामुळे या शिबिरात मोठय़ा संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.