ऑस्ट्रेलियातील माझी शाळा

मराठी भाषा सातासमुद्रापार पोहोचवणारे अनेक हात आपल्याला दिसतात. अमेरिकेप्रमाणेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मराठी भाषिक वर्तुळातील पुढच्या पिढीत आपल्या राजभाषेचे संस्कार अधिकाधिक पोहोचावेत यासाठी प्रयत्नशील असणारी संस्था म्हणजे संकल्प-एकनिश्चय आणि त्यांचा उपक्रम ‘माझी शाळा.’ याबाबत सांगत आहेत संस्थेचे समन्वयक गणेश किरवे.

ऑस्ट्रेलियात वाढणाऱया मुलांचे घरातील, मित्र-मैत्रिणींमधील मराठीतील संभाषण दिवसेंदिवस खुंटत आहे हे लक्षात आले. केवळ घरातच नव्हे तर हिंदुस्थानभेटीमध्येदेखील आजी-आजोबांबरोबर मराठीतील संवाद कमी होऊ लागला होता. आपल्या मुलांना मराठीतून लिहिता, वाचता आणि बोलता आले पाहिजे, याच उद्देशातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये 5 सप्टेंबर 2015 रोजी ‘माझी शाळा’ भरली आणि दर शनिवारी आमची शाळा चिमुकल्यांनी फुलू लागली.

खरे पाहिले तर ही शाळा फक्त मुलांची नव्हे, आम्हा पालकांची आणि शिक्षकांची होती. शिक्षण क्षेत्रातील कोणताही खास अनुभव नसताना परक्या भूमीत आपल्या भाषेचे संस्कार रुजावेत यासाठी महत्त्वाची पायरी होती ती म्हणजे मुलांना शाळेत आणणे आणि त्यांच्यात भाषेची गोडी रुजवणे. म्हणूनच आम्ही पालकांबरोबर संवाद साधणे सुरू केले. घरोघरी जाऊन त्यांना या उपक्रमाचे, भाषेचे महत्त्व पटवून दिले.

हसत खेळत आणि ऑस्ट्रेलियन शिक्षणपद्धतीला मिळती-जुळती अशी शिक्षणपद्धती तयार झाली. सोशल मीडियावर पोस्ट होणारे ‘माझी शाळा’चे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती, वाढदिवस तसेच इतर स्थानिक कार्यक्रमांत ‘माझी शाळा’तील मुलांचे मराठीतून होत असलेले संभाषण, वागणूक, शिस्त अनेकांचे लक्ष वेधून घेऊ लागली. नवनवीन कल्पना आकारास येऊ लागल्या. हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा होऊ लागल्या. सांस्कृतिक कार्यक्रमांमधील विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग वाढू लागला आणि संकल्प-एक निश्चय प्रणीत ‘माझी शाळा’ने 5 सप्टेंबर 2016 रोजी ‘पहिला वर्धापन दिन’ही साजरा केला. असाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवत शाळेच्या प्रगतीचा आलेख वर वर सरकत आहे.

‘माझी शाळा’ दर शनिवारी अडीच ते तीन तासांसाठी भरते. सुरुवातीला 25 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या एका वर्गापासून आजमितीला नऊ वर्गांमध्ये 100 विद्यार्थी शिशू ते इयत्ता पाचवीपर्यंत शिकत आहेत. या प्रवासात कोरोना काळातही ‘माझी शाळा’ सलग दोन वर्षे आभासी तत्त्वावर कार्यरत राहिली.

आमच्या ‘माझी शाळा’ या उपक्रमाला डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन, व्हिक्टोरियाद्वारे ‘मान्यताप्राप्त भाषा शाळा’ म्हणून पात्र ठरवण्यात आले आहे. मराठी या विषयापुरते मर्यादित न राहता मुलांच्या सुप्त कलागुणांना योग्य तो मंच उपलब्ध करून देण्याचे कार्य ही शाळा करते. सामान्य ज्ञान, सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, उत्तम कल्पनाविस्तार, किल्ले स्पर्धा असे अनेक उपक्रम वर्षभर आयोजिले जातात. 2022 पासून माझी शाळेने ‘ज्ञानदीप’ या वार्षिक अंकाची सुरुवात केली. वाचन संस्कृती जपावी याकरिता संस्थेद्वारे ‘मायबोली’ या ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचे श्रेय जाते ते शिक्षकांची तळमळ, स्वयंसेवकांची कठोर मेहनत आणि त्याला मिळत असलेली पालकांची आणि विद्यार्थ्यांची उत्तम साथ. पालकांच्या आणि अनेक देणगीदारांच्या रूपाने संस्थेला लाभलेले आर्थिक बळ खूप महत्त्वाचे काम बजावत आहे. आर्थिक आणि साहित्य देणगीमुळे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचलित ‘ग्रंथ आपल्या दारी’ या उपक्रमातून आलेल्या 25 ग्रंथपेटय़ा आणि इतर साहित्य अशा जवळपास 1000 पेक्षा अधिक पुस्तकांनी ‘मायबोली’ हे ग्रंथालय समृद्ध झाले आहे.

‘माझी शाळा’चा हा आठ वर्षांचा प्रवास पुढेही अखंडपणे चालणार आहे.

मायमराठीचे जतन
देशाबाहेरही आपल्या सांस्कृतिक वातावरणाशी आपली नाळ टिकून राहावी, तो अनुभव कायम घेता यावा या उद्देशाने ऑस्ट्रेलियामध्ये कामानिमित्त स्थायिक झालेले मराठीजन अनेक मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. व्हिक्टोरिया राज्यातील काही उपनगरांमधील स्थायिक मराठी भाषिकांना इथे वाढणाऱया आपल्या मराठी मुलांचा मराठी संस्कृती आणि मराठी भाषेपासून वाढत जाणारा दुरावा प्रकर्षाने जाणवू लागला. त्यातूनच 2015 मध्ये ‘संकल्प-एकनिश्चय’ या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱया संस्थेचा जन्म झाला. परदेशात राहत असतानादेखील माय मराठीची नाळ तुटू न देता हा अमूल्य असा ठेवा आपण पुढच्या पिढीला या संस्थेमार्फत हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करत राहणे अशी निरपेक्ष भावना या संस्थेची आहे. याच भावनेतून आणि या उद्दिष्टाला डोळय़ांसमोर ठेवून संकल्प-एकनिश्चय प्रणीत ‘माझी शाळा’चा जन्म झाला आहे.

[email protected]