हिंदू गोवंश रक्षा समितीचा कार्यकर्ता 5 वर्षांनंतर कारागृहाबाहेर, बॉम्बहल्ल्याचं नियोजन केल्याचा होता आरोप

बॉम्बस्फोट प्रकरणी जामीन मंजूर झालेला ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’चा कार्यकर्ता वैभव राऊत गुरुवारी रात्री उशिरा नालासोपारा येथील घरी परतला. मागील 5 वर्षांपासून तो तुरुंगात होता. गुरुवारी सुटून आल्यानंतर त्याचं स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात आलं.

ऑगस्ट 2018 मध्ये महाराष्ट्र दहशतवात विरोधी पथकाने ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’चा कार्यकर्ता वैभव राऊत याला नालासोपाऱ्यातील घरातून अटक केली होती. वैभव राऊतच्या घरातून 8 बॉम्ब आणि गोदामातून 12 बॉम्ब जप्त करण्यात आले होते. याशिवाय त्याच्याकडून एक डायरीही जप्त करण्यात आली होती. या डायरीत आरोपीचं हल्ल्याचं नियोजन आणि बॉम्ब तयार करण्याविषयीची तपशीलवार माहिती होती. पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलवर हल्ला करण्यासाठी बॉम्ब तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मागील 5 वर्षांपासून तो तुरुंगात होता. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने आरोपी वैभव राऊतला जामीन मंजूर केला होता.