देवेंद्र फडणवीसांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ पाहावा; थिएटर बुक करतो, नाना पटोले यांचा पलटवार

मोदींवरचा सिनेमा फ्लॉप झाला. नितीन गडकरींवरील हाय वे मॅन सिनेमा फ्लॉप झाला. गोडसेंवरील चित्रपट फ्लॉप झाला आणि सावरकर चित्रपटही फ्लॉप झाला आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट पाहावा. गांधी विचारांसाठी फडणवीसांनी हा चित्रपट पाहायला हवा. त्यांच्यासाठी थिएटर बुक करतो, असा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राहुल गांधी जर सावरकर चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खं थिएटर बुक करेन, असा टोला मारला होता. त्यावर पलटवार करताना नाना पटोले म्हणाले, भाजपच्या सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी तसेच लोकशाही व्यवस्था व राज्यघटना टिकवण्यासाठी हा लढा सुरू आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती दाखवून भाजप दुसऱया पक्षातील लोकांना पक्षात प्रवेश देते पण त्यानेही काही फरक पडत नाही. मोदी सरकारची जुमलेबाजी व फेकूगिरी आता चालणार नाही. भाजपच्या हुकूमशाही सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही.

दिलीप माने यांचा काँग्रेस प्रवेश

सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने व वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी पेंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. नाना पटोले यांनी दोघांचेही काँग्रेस पक्षात स्वागत केले.

आयकर कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक

काँग्रेस पक्षाचे गोठवलेले बँक खाते, आयकर विभागाने पाठवलेली नोटीस तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक याच्या निषेधार्थ रविवारी ठाण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. काँग्रेसच्या कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आयकर विभाग हाय हाय… शर्म करो मोदीजी शर्म करो… गोठवलेले बँक खाते रद्द झालेच पाहिजे.. अशा संतप्त घोषणा देण्यात आल्या.