सिंचन घोटाळाफेम अजितदादांचे कौतुक करत मोदींचे भ्रष्टाचारावर भाषण

ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला त्या अजित पवारांचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरातील प्रचारसभेत भ्रष्टाचारावर भाषण ठोकले. देशात इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याची भीती मोदींच्या पूर्ण भाषणात दिसून आली.

मिंधे आणि अजित पवार गटाला सोबत घेतल्याने महाराष्ट्रात भाजपची गोची झाली आहे. तसे स्पष्ट चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यामुळेच प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासूनच मोदींना महाराष्ट्र गाठावे लागले आहे. या सभेत मोदींनी एककलमी कार्यक्रमाप्रमाणे महाविकास आघाडी सरकार आणि इंडिया आघाडीबद्दल पोटशूळ व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेजारी बसलेल्या मिंधेंनी मंत्रिपद उबवले होते याचा सोयीस्कर विसर मोदींना पडला.

ज्या शिवसेनेमुळे भाजप वाढला, मोदींना पंतप्रधानपद दिसले त्याची जाणही मोदींनी ठेवली नाही. शिवसेनेविषयी बोलताना त्यांचा तोल सुटला. पंतप्रधान मोदींनी भोपाळच्या सभेत अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळय़ाचा आरोप केला होता. त्या अजित पवारांचेच कौतुक करण्याची वेळ आज मोदींवर आली. फडणवीस, शिंदे, अजित पवार यांचे सरकार वेगाने काम करत आहे, असे मोदी म्हणाले.

म्हणे तोडा आणि राज्य करा ही काँग्रेसची नीती
ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा धाक दाखवून भाजपने देशभरात फोडाफोडीचे राजकारण चालवले आहे. असे असताना मोदींनी मात्र ‘आम्ही नाही त्यातले’ असा आव आणला व तोडा आणि राज्य करा ही काँग्रेसची रणनीती असल्याचा आरोप केला.