‘नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचा वाद हायकोर्टात

माऊली भगवती प्रॉडक्शन्सच्या ‘नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकावरून निर्माण झालेला वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या नाटकातील संहिता, सादरीकरण तसेच ट्रेडमार्कचे आमच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या मूळ नाटकाशी साधर्म्य आहे. त्यामुळे आमच्या व्यावसायिक हक्कांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप करीत माऊली प्रॉडक्शन्सचे मालक व निर्माते उदय धुरत यांनी माऊली भगवती प्रॉडक्शन्सचे मालक प्रमोद धुरत तसेच अभिनेते शरद पोंक्षे यांच्याविरोधात दावा दाखल केला आहे.

उदय धुरत यांनी ऍड. हिरेन कमोद व ऍड. महेश म्हाडगुत यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्यापुढे सुनावणी झाली. ‘नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाच्या जाहिराती 15 ऑगस्टपासून केल्या जात होत्या. असे असताना माऊली प्रॉडक्शन्सने खूप विलंबाने दावा दाखल केला आहे, असे नमूद करीत न्यायमूर्ती छागला यांनी ‘नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाविरोधात अंतरिम मनाई आदेश देण्यास नकार दिला. तथापि, स्वामित्व हक्काच्या वादावर सुनावणी घेण्याच्या अनुषंगाने या नाटकाच्या प्रयोगाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यास माऊली प्रॉडक्शन्सला मुभा दिली आहे. दरम्यान, न्यायालयाने प्रतिवादी माऊली भगवती प्रॉडक्शन्सला 13 ऑक्टोबरपर्यंत याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले असून 19 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.