एनसीईआरटीच्या दहावीच्या पाठय़पुस्तकात ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा; काँग्रेस, एनसीपी, टीएमसी, सीपीआय राष्ट्रीय पक्षांच्या यादीतून बाहेर

एनसीईआरटीच्या दहावीच्या पाठय़पुस्तकात सध्या तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा (आप) उल्लेख राष्ट्रीय पक्ष म्हणून करण्यात आला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस, एनसीपी, टीएमसी, सीपीआय या पक्षांना राष्ट्रीय पक्षांच्या यादीतून बाहेर फेकले आहे.

दहावीच्या सोशल सायन्स या पाठय़पुस्तकात प्रथमच आपल्या राष्ट्रीय पक्षांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. पाठय़पुस्तकाच्या पान क्रमांक 54 आणि 55 मध्ये हा बदल पाहायला मिळणार आहे. या पुस्तकातील पाठ क्रमांक 4 हा राजकीय पक्षांवर आधारित असून या धडय़ात आप राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख दिसेल. तसेच पक्षाशी संबंधित काही घटना धडय़ात नमूद करण्यात येणार आहे. यात पक्षाची स्थापना, कार्य याची माहिती मिळेल. याशिवाय धडय़ात दिल्ली आणि गुजरात विधानसभा निवडणुका, 2019 च्या लोकसभा निवडणुका यांचादेखील उल्लेख दिसेल.

धडय़ात आपविषयीची माहिती

आम आदमी पार्टी (आप) – 2011 च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर 26 नोव्हेंबर 2012 ला आपची स्थापना झाली. स्वच्छ प्रशासन, पारदर्शकता, सुशासन या विचारांवर आधारित आपची स्थापना झाली. स्थापनेच्या एक वर्षानंतर आप दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. आपने काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. 2022 च्या गुजरात निवडणुकीत आप तिसरा मोठा पक्ष ठरला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपचा एक खासदार निवडून आला.