पारंपारीक पेहराव बनणार नौदलाचा नवीन ड्रेस कोड

नौदलाच्या जवानांना पारंपारिक भारतीय पोशाख घालण्याची परवानगी देण्याबाबत सध्या चर्चा आहे. हा ड्रेस कोड लागू झाल्यास मेस आणि वॉर्डरूममध्ये जवान आणि अधिकारी हिंदुस्थानी पोशाखात दिसतील.आत्तापर्यंत सैन्यात हिंदुस्थानी कपडे घालण्याची परवानगी नव्हती.

नौदलाच्या तीन दिवसीय परिषदेत नॅशनल सिव्हील ड्रेसचे प्रदर्शन भरवण्यात आले. हे कपडे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या समोर प्रदर्शित करण्यात आले. ज्यामध्ये कुर्ता पायजमा, फॉर्मल वेस्टकोट, चूडीदार पायजमा आणि गळाबंद सूट होता. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा ठेवण्यात येणार आहे. ब्रिटीशांच्या जमान्यापासूनच सैन्यात हिंदुस्थानी पोशाखाला परवानगी नाही. सैन्यांसोबत पाहुणेदेखील नौदलाच्या खानावळीत हिंदुस्थानी पोशाख घालून जाऊ शकत नाही. मात्र पाश्चिमात्य संस्कृती हटविण्यासाठी नौदल तत्पर असतं. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले होते, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून पंचप्राणचा उल्लेख केला होता.गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्याचाही त्यात समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी नौदलाच्या स्वदेशी चिन्हाचे अनावरणही केले, ज्यावरून लाल रंगाचा सेंट जॉर्ज क्रॉस काढण्यात आला होता. मागच्यावर्षी आयएनएस विक्रांत कार्यान्वित झाल्याच्या निमित्ताने हे करण्यात आले होते. गेल्या महिन्यात नौदलात आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे.