अमित शहांच्या 75 मिनिटांच्या दौऱ्यावर कोट्यवधींची उधळण

मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले, त्यांचे स्मरण राहिले बाजूला… भाजपकडून मुक्तिसंग्रामासाठी मिळालेल्या 40 कोटींच्या निधीवर मजा मारणे सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तब्बल 75 मिनिटांच्या दौर्‍यावर कोट्यवधी रुपये उधळण्यात येत असून अयोध्यानगरीच्या मैदानावर होणारी सभा ऐनवेळी सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करून कलाग्रामसमोरील रिद्धीसिद्धी लॉनवर ठेवण्यात आली आहे. मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात सभा नको म्हणून भाजपच्या पदाधिकार्‍यांनी थेट दिल्लीवरून सभेचे स्थळच बदलण्यास भाग पाडले. आता अतुल सावे, हरिभाऊ बागडे, रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात ही सभा होणार आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवाचा समारोप 17 सप्टेंबर रोजी होत आहे. अमृतमहोत्सवाच्या सुरुवातीपासूनच राज्य सरकार यासंदर्भात उदासीन होते. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन अपेक्षित होते. परंतु संपूर्ण वर्ष रिकामे गेले. सरकारला मराठवाड्याकडे बघायलाही वेळ मिळाला नाही. वर्ष सरता सरता रोजगार हमी योजनेचे मंत्री संदिपान भुमरे यांची मुक्तिसंग्राम समारोप समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. भुमरे यांच्या समितीने किती बैठका घेतल्या, कोणते कार्यक्रम आखले… हा सगळा संशोधनाचा विषय आहे.

समारोप तोंडावर आल्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपाचे प्रशासक यांनी धावाधाव करून कार्यक्रमाची आखणी केली. ‘हास्यजत्रा’ हा कार्यक्रमही ठेवण्यात आला. त्यावरून सांस्कृतिक समितीने संताप व्यक्त केला. परंतु मनपा प्रशासकांनी त्याच्या जोडीला ‘मराठवाड्याची लोकधारा’ असणार आहे, असे सांगून वेळ मारून नेली. हास्यजत्रेवरून टीका होताच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मुक्तिसंग्रामाचा निधी खर्च करण्याची वेळ येताच भाजप आणि मिंध्यांची यात एण्ट्री झाली.

40 कोटींचे लोणी ओरपण्यासाठी…
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या समारोप कार्यक्रमासाठी 40 कोटी रुपये सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. या पैशातून अगोदर अयोध्यानगरीच्या मैदानावर अमित शहा यांच्या सभेसाठी 9 कोटींचा मंडप उभारण्यात येणार होता. अयोध्यानगरी पश्चिम मतदारसंघात म्हणजेच आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे सभेचे ठिकाण बदलण्यात यावे म्हणून भाजपच्या पदाधिकार्‍यांनी थेट दिल्ली गाठली. अयोध्यानगरीतून सभा थेट कलाग्रामसमोरील रिद्धीसिद्धी लॉनवर पळवण्यात आली. रिद्धीसिद्धी लॉन रावसाहेब दानवे, अतुल सावे आणि हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघाच्या त्रिकोणावर आहे.

75 वा वर्धापन… 75 मिनिटांचा दौरा
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा हा 75 वा वर्धापनदिन आहे. अमृतमहोत्सवाच्या समारोपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत असून त्यांनी त्यासाठी तब्बल 75 मिनिटांचा वेळ दिला आहे. अमित शहा हे बिहारमधील दरभंगा येथून दुपारी 3 वाजता वायुदलाच्या विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे येणार आहेत. सभास्थळी त्यांचे सायंकाळी 05.30 वाजता आगमन होणार असून 06.30 वाजता ते हैदराबादला प्रस्थान करण्यासाठी विमानतळाकडे रवाना होणार आहेत. मुक्तिसंग्रामाच्या या कार्यक्रमातच भाजप पदाधिकार्‍यांचीही बैठक होणार असल्याची माहिती आहे.

असा आहे दौरा…

दुपारी 3 वाजता बिहारमधील दरभंगा येथून वायूदलाच्या विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान
सायंकाळी 5.20 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावर आगमन
सायंकाळी 5.30 वाजता कलाग्रामसमोरील रिद्धीसिद्धी लॉन येथे आगमन
सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजेपर्यंत मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमासाठी राखीव
सायंकाळी 6.30 वाजता विमानतळाकडे प्रस्थान
सायंकाळी 6.50 मिनिटांनी हैदराबादकडे प्रस्थान