कोरोना काळातील नुकसान, कर्जाचा डोंगर वाढल्याने नितीन देसाई यांनी टोकाचे पाऊल उचलले ?

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी मंगळवारी आत्महत्या केली. मुंबईपासून जवळच असलेल्या कर्जतजवळ त्यांनी एनडी स्टुडियो उभारला होता. याच स्टुडियोमध्ये त्यांनी गळफास घेत आपले जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र आर्थिक विवंचना, कर्जाचा वाढता डोंगर यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. ठराविक मुदतीमध्ये घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज न फेडल्यामुळे देसाई यांनी उभ्या केलेल्या स्टडियोवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कोरोना काळात जवळपास अडीच वर्ष हा स्टुडियो कोणत्याही चित्रीकरणाशिवाय होता. यामुळे देसाई यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं असावे असे सांगितले जात आहे.

दिग्दर्शत महेश मांजरेकर यांनी देसाई यांच्या आत्महत्येच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, माणूस वरून छान दिसत असला तरी त्याच्या मनात काय चालले आहे हे कळणं कठीण असतं. कोरोनाचा काळ हा सगळ्यांसाठी चिंतेचा होता. मांजेरकर यांनी पुढे म्हटले की, “कोरोनाच्या काळात अडीच वर्ष कोणत्याही शूटींगशिवाय स्टुडियो चालवणं हे देखील एक तणावाचं कारण असू शकतं. आपण माणसाला बघताना तो छान वाटतो मात्र त्यालाही काही स्ट्रेस असतो. मी देखील स्ट्रेसमधून गेलोय. माझीही एक मोठी टीम आहे ती मी अडीच वर्ष कशी सांभाळली आहे हे माझं मला माहिती आहे.”

नितीन देसाई यांनी काही कारणांनी सीएफएम या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 2016 आणि 2018 अशा वेगवेगळ्या दोन वर्षात कर्जाचा करार नामा झाला होता. यासाठी देसाई यांनी विविध सर्व्हेनंबर असलेल्या तीन मालमत्ता (26 एकर, 5-89 एकर आणि 10.75 एकर) तारण ठेवली होत्या. काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज खाते एडलवाइस ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. परंतु कर्जाची वसुली होत नव्हती. 180 कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले होते. मात्र व्याजासह 3 मे 2022 पर्यंत सदर कर्जाची रक्कम सुमारे 249 कोटी रुपयांवर पोचल्याचे वृत्त यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहे.