केरळमध्ये निपाहबाधितांची संख्या वाढली; संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

केरळमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याला निपाह संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने निपाह विषाणूबाधित रुग्णांची संख्या पाच झाली आहे. पाच रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात निपाहचा संसर्ग वाढत असल्याने केरळच्या कोझिकोड जिल्ह्यांत पुढील दोन दिवसांसाठी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या काळात ऑनलाईन वर्ग घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, वाढत्या संसर्गामुळे विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

केरळमध्ये चार निपाहबाधित रुग्ण होते. एका आरोग्य कर्मचाऱ्याचा निपाह अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. निपाहबाधित रुग्णावर उपचार करताना हा आरोग्य कर्मचारीही निपाहच्या विळख्यात अडकला. निपाहबाधितांच्या संपर्कात 153 आरोग्य कर्मचारी आहेत. तर बाधित झालेल्या पाचपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या बाधित असलेल्या तिघांवर उपचार सुरू आहेत. कोझिकोडमध्ये निपाहच्या उद्रेकानंतर वायनाड या शेजारच्या जिल्ह्यात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. वायनाड जिल्हा प्रशासनाने निपाह प्रतिबंध योजनेअंतर्गत आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी 15 मुख्य समित्या देखील स्थापन केल्या आहेत.

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकही घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले. सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, आदी प्रतिबंधक उपाय पुढील 10 दिवसांसाठी लागू करण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे, तर पोलिसांच्या परवानगीनेच मेळावे घेण्यात येणार आहेत.

बैठकीनंतर आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की, बाधित रुग्णांच्या संपर्क यादीत असलेल्या 789 व्यक्तींची ओळख पटली आहे. त्यापैकी 77 व्यक्ती उच्च-जोखीम श्रेणीतील आहेत आणि 17 जणांना कोझिकोडमधील रुग्णालयांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जंगल परिसरात राहणाऱ्या लोकांना सर्वाधिक खबरदारी घ्यावी लागते, असं आरोग्यमंत्री जॉर्ज म्हणाले होते. निपाह विषाणूचे ताजे प्रकरण जंगलाच्या पाच किलोमीटर परिसरात उद्भवले आहे.