म्हाडाच्या 4 हजार 82 घरांसाठी एक लाख अर्ज

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 4082 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1,00,935 नागरिकांनी अर्ज सादर केले असून त्यापैकी 73,151 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीला 22 मेपासून सुरुवात झाली असून उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील 843 सदनिकांकरिता 24,724 अर्ज प्राप्त झाले आहेत. अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिकांकरिता 51,198 अर्ज तर मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांकरिता 7,286 अर्ज प्राप्त झाले आहेत. उच्च उत्पन्न गटातील 120 सदनिकांसाठी 2,074 अर्जदारांनी अर्ज केले आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1947 सदनिकांसाठी 15,653 अर्ज प्राप्त झाले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार अर्जदार 10 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील.