चुलत भावाशी लग्नास नकार दिल्याने मुलीची केली हत्या, आई-वडिलांना जन्मठेपेची शिक्षा

इटलीच्या एका न्यायालयाने मंगळवारी एका पाकिस्तानी जोडप्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या पाकिस्तानी जोडप्याने त्यांच्याच मुलीची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. त्यांच्या मुलीने काकांच्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबियांनी 2021 साली मुलीची हत्या केली.

अठरा वर्षीय समन अब्बास बोलोग्ना येथील नोवेल्लारा येथे राहत होती. ती मे 2021 मध्ये अचानक बेपत्ता झाली होती. मुलीच्या कुटुंबियांचे म्हणणे होते की, तिने पाकिस्तानात राहणाऱ्या चुलत भावाशी लग्न करावे, मात्र त्यासाठी ती तयार नव्हती. इटली येथे राहणाऱ्या रेगियो एमिलिया मध्ये एका न्यायधिशांनी सुनावणीमध्ये सांगितले की, मुलीची हत्या तिच्या आई-वडिलांनी केली होती. मुलीच्या आई-वडिलांच्या सहमतीने काकाने तिचा गळा आवळून हत्या केली. दोषी काकाला 14 वर्षांची शिक्षा सुनावली गेली, तर दोन चुलत भावांची निर्दोष सुटका करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, समन अब्बासने चुलत भावाशी लग्न करण्यास नकार देत पोलिसांसमोर तिच्या पालकांवर आरोप केले होते. तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम होते.  त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला नोव्हेंबर 2020 मध्ये आश्रयस्थानात ठेवले होते. मात्र तिला तिच्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करायचे होते, यासाठी ती एप्रिल 2021 मध्ये तिचा पासपोर्ट घेण्यासाठी तिच्या कुटुंबाला भेटायला गेली होती. एप्रिलमध्ये कुटुंबीयांना भेटल्यापासून ती बेपत्ता होती. तिच्या प्रियकराने पोलीस स्थानकात ती बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी मे महिन्यात तिच्या घरावर छापा टाकला, त्यादरम्यान समनचे आई-वडील आधीच पाकिस्तानात गेल्याचे समजले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 30 एप्रिल आणि 1 मे च्या रात्री मुलीची हत्या झाल्याची शक्यता आहे. पाच जण घरातून फावडे, लाकूड, बादल्या घेऊन बाहेर पडताना आणि अडीच तासांनी परतताना दिसले. जवळपास वर्षभरानंतर समन अब्बासचा मृतदेह एका फार्महाऊसमध्ये विछिन्न अवस्थेत  सापडला होता. तिच्या भावाने पोलिसांना सांगितले की, त्याने आपल्या वडिलांना हत्येबद्दल बोलताना ऐकले आहे आणि काकांनी आपल्या बहिणीची हत्या केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, वडील शब्बर अब्बास यांना पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली. ऑगस्ट 2023 मध्ये इटलीकडे सोपवण्यात आले. दानिश हसनैन या काकाला फ्रेंच अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले, तर चुलत भावांना स्पेनमध्ये अटक करण्यात आली. या खटल्यात हे चार जण हजर होते मात्र त्याची आई नाझिया शाहीन अद्याप फरार आहे.