मणिपूरच्या मुद्द्यावरून संसद ठप्प, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मणिपूरप्रश्नी पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करावे, ही मागणी विरोधकांनी आजही लावून धरल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांतले कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेचे कामकाज दोन वेळा तर राज्यसभेचे तीन वेळा तहकूब केल्यानंतर शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

लोकसभा व राज्यसभेत मणिपूरच्या मुद्दय़ावरून विरोधक आजही आक्रमक होते. कामकाज सुरू होताच ‘मणिपूर मणिपूर’च्या घोषणा देत लोकसभेत वेलमध्ये येत विरोधकांनी एकच हल्लाबोल केला. परिणामी कामकाज दुपारी बारा, त्यानंतर दोन व नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

राज्यसभेतही गोंधळाचे हेच चित्र कायम होते. विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज सुरुवातीला दुपारी बारा, त्यानंतर दोन व नंतर थोडा वेळ आवश्यक कामकाज उरकून अखेर दिवसभरासाठी सभागृह तहकूब करण्यात आले.